Kinwat News: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच स्तरातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. हा निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार यांच्या गटासाठी धक्का मानला जात आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने शरद पवार गटाला तयारी करण्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार गटाची भूमिका काय असणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
निवडणूक आयोगाच्या या निकालावर टीका करताना किनवट विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाचा निर्णय दुर्दैवी असला तरी भविष्यात शरद पवार हेच माझा पक्ष आणि चिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या विचारांवरच आपली वाटचाल सुरु असणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निवडणूक आयोग सत्याधरांचे हाताची बाहुली भरून काम करत असल्याचा आरोप ही यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केला असून पक्ष आणि चिन्ह घेतल्याने कोणी शरद पवार होत नाही. विकास कार्यापुढे चिन्हाला फारसं महत्त्व नसते हे चिन्ह मिळाले ते एका तासात घराघरात पोहोचेल. त्यामुळे या निर्णयाचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. आगामी निवडणुकीत शरद पवारांची खरी ताकद दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. किनवट मतदारसंघातून घड्याळ चिन्हावर सलग पंधरा वर्षे निवडून आलेले माजी आमदार प्रदीप नाईक यांच्याही राजकीय भवितव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लोकशाहीची हत्या झाली आहे. विरोधकांनी कितीही षडयंत्र केले तरी शरद पवार हेच आमचे नेते आहेत. पक्ष स्थापनेपासून शरद पवार यांच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभा राहिलो. सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र जनतेला कळून चुकले आहे. विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी कुठलेही नुकसान होणार नाही. त्या उलट शरद पवार यांच्याबद्दल जनतेतून सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर कोणत्याही हालचाली झाल्या तरी किनवट विधानसभा मतदारसंघात मात्र माजी आमदार प्रदीप नाईक यांचा किल्ला साबूत असल्याची परिस्थिती या मतदारसंघातील जनतेमध्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेच्या पहिल्या विधानसभेपासून शरद पवारांसोबत प्रदीप नाईक कायम आहेत. पक्ष, निशाणीची ओळख नसताना माजी आमदार प्रदीप नाईक हे नव्याने किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून पराभूत झाले. परंतु, नंतरच्या पाच वर्षात प्रत्येक गावागावांमध्ये घराघरांमध्ये शरद पवारांचे विचार आणि घडी निशाणी रुजवली, त्यामुळे आज जरी घड्याळ निशाणी अजित पवार (Ajit pawar) गटाला गेली असेल तरीही जो सामान्य कार्यकर्ता गेल्या २४ ते २५ वर्षापासून शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या विचारांच्या सोबती आहे. दोन गट झाल्यानंतर सुद्धा माहूर किनवट विधानसभामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फूट पडली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काही पण लागला असेल तरीही किनवट विधानसभा मतदारसंघातील जनता ही शरद पवार व प्रदीप नाईक यांच्या सोबतच आहे, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी मांडली.
(Edited By Sachin waghmare)