Beed News, 04 Sep : राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (ता.03 सप्टेंबर) पार पडले.
पुरस्कारासाठी दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नाव पुकारताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमन गेले. पण, आपल्या नेत्याच्या आठवणींनी उपस्थित समर्थकांच्या डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या होत्या. विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिति, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली होती.
त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हा पुरस्कार जाहीर केला होता. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांना 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांना मोठे कौतुक आणि त्यांच्या आठणींना उजाळा मिळाला होता.
तीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिव स्मारकासाठी रस्त्यावरची लढाई लढतानाच विधीमंडळातही आक्रमक आणि अभ्यासू मांडणी करणाऱ्या दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांना 2020 - 21 या वर्षाकरता त्यांना महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार मिळाला. मराठा महासंघातून मराठा आरक्षण लढ्यात सामील झालेले दिवंगत मेटे 27 वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहीले. सर्वाधिक वेळा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा त्यांचा विक्रम कायम आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिव स्मारक, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, शासकीय नोकर भरतीमधील वयाची अट, शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन, मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्या वेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पनाही मांडण्यातही त्यांचा पुढाकार होता.
त्याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला. पोलिस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. या बाबतच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणाने विनायकराव मेटे यांनी कायम विधीमंडळाचे सभागृह दणाणून सोडले. या मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यावरचीही लढाई लढली. दरम्यान, 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला जाताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
परंतु, त्यांच्या कर्तृत्वाचा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांच्या पश्चात् सन्मान झाला त्यांच्या पत्नी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायकराव मेटे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजासाठी खूप काम केलं परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. त्यांची आठवण आपल्या सोबत आहे आणि त्यांनी केलेले काम कायम आहे, असे शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.