

Latur DCC Bank Election news : लातूर जिल्ह्यातील तीव्र दुष्काळ, पाणी चाऱ्याची टंचाई आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्यासाठी हा योग्य काळ नसल्याने निवडणूक पुढे ढकला अशी मागणी भाजप समर्थक सभासदांनी केली होती. लातूर जिल्हा बँकेवर प्रशासक नेमून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.
यावरून भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व युती सरकारमधील मंत्री असलेले राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. सहकार खात्याअंतर्गत असलेल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून बाबासाहेब पाटील यांनीच दबाव आणत निवडणूक घेण्याचा आणि त्यातून काँग्रेसला मदत करण्याचा डाव टाकल्याचा थेट आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता.
महायुतीमध्ये मंत्री असताना त्यांना युती धर्माचा विसर पडला आहे का? ते जर काँग्रेसची साथ देणार असतील तर आम्ही त्यांच्या विरोधात असू, असा इशारा देत नव्या वादाला निलंगेकर यांनी तोंड फोडले होते. यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मात्र योग्य वेळी उत्तर देऊ, अशी सावध भूमिका घेतली होती.
लातूर जिल्हा बँकेवर प्रशासक नेमून दुष्काळाच्या नावावर निवडणूक पुढे ढकलण्याचा संभाजी पाटील निलंगेकर यांचा डाव अखेर फसला आहे. आज जिल्हा सहनिबंधक कार्यालयाकडून लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा व संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बाबासाहेब पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बँकेतील विद्यमान सत्ताधारी काँग्रेस सोबत म्हणजेच देशमुख कुटुंबांसोबत एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तसा थेट आरोपच केला आहे. त्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरक्षित होणार एवढे मात्र निश्चित.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ चे नियम १९ अन्वये लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था लातूर यांनी जाहीर केला आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित आदेशामध्ये मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना, अंतिम मतदार यादी, नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी, माघार आणि मतदान व मतमोजणी या सर्व टप्प्यांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. तर 19 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. 21 ऑक्टोबर रोजी वैध ठरलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे. 5 नोव्हेंबरला अंतिम उमेदवारांची यादी व त्यांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान तर 16 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केशव शेटके, सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार विभागाने आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.