Dhiraj Dehsmukh : लातूर जिल्हा बँकेच्या कारभार पारदर्शकच, विरोधकांना प्रशासक आणायचाय; धीरज देशमुखांनी मांडला लेखाजोखा!

Dhiraj Deshmukh's response to allegations News : लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाच्या पॅनलमध्ये बँकेच्या सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे.
dhiraj deshmukh
dhiraj deshmukh sarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur DCC Bank : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना विद्यमान चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आरोप खोडून काढत लातूर जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शकच आहे, पण विरोधक प्रशासक आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा देशमुख यांनी केला. लातूर जिल्हा बँक ही राज्यातील टाॅप तीन बँकांमध्ये समाविष्ट आहे, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाच्या (BJP) पॅनलमध्ये बँकेच्या सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही सुरू झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून बँकेवर काँग्रेस म्हणजेच देशमुख कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे. परंतु जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची नाही तर देशमुख कुटुंबाची झाली आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता ते आपल्या संस्थांना दिले जाते, असाही आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी माध्यमांशी संवाद साधत लातूर जिल्हा बँकेचा लेखाजोखा मांडत विरोधकांना उत्तर दिले. लातूर जिल्हा बँकेचा सलग ४ वर्षे ढोबळ नफा १०० कोटीहुन अधिक राहिला आहे. बँकेने १ हजार ७८० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील एकुण पीककर्ज वाटपात एकट्या जिल्हा बँकेचा सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असल्याचे ते म्हणाले.

माजीमंत्री दिलीपराव देशमुख व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बँक वाटचाल करीत आहे. गेल्या ५ वर्षांत बँकेने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवले आहेत. पारदर्शक नोकर भरतीतून लातूर जिल्ह्यातील २६३ भूमिपुत्रांना बँकेत नोकरी उपलब्ध करुन दिली. नोकर भरतीत ७० टक्के जागांवर स्थानिकांना संधी दिली. या बँकेमुळे भूमिपुत्रासांठी राज्य शासनाला तसा निर्णय घ्यावा लागला आहे.

बँकेने शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेता यावे म्हणून कर्ज उपलब्ध करुन दिले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शुभमंगल योजना राबवली. पुढे या योजनेत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. बचतगटांना सक्षम करण्यासाठी बँकेने सातत्याने प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठीच बँकेचा पारदर्शक कारभार केला आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

विरोधकांची बेछूट टीका..

या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी बँकेची कसलीही माहिती, कसलाही अभ्यास न करता बेछूट टिका सुरु केली आहे. अनेक गोष्टींचा विपर्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला आहे. जिल्ह्याची सहकार चळवळ कोणाच्या हाती द्यायची, हे सुज्ञ मतदार ठरवतील पण विरोधकांनी टिका करण्यापेक्षा व्हिजन सांगावे, असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.