Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रडीचा डाव; संभाजी निलंगेकरांचा आरोप

Latur District Bank Election News : लातूर जिल्हा बँक सहकारी बँक न राहता देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
samabhaji patil, dheeraj deshmukh
samabhaji patil, dheeraj deshmukh Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राम काळगे

Latur News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रडीचा डाव खेळला जात असून सहकार मंत्र्यांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग करत विरोधकाचे उमेदवारी अर्ज अवैध करण्याचा घाट घातला जात आहे. बँकेची निवडणूक खुल्या वातावरणात होऊ द्या. बँकेचा कारभार चांगला की वाईट, हे जनतेला ठरवू द्या. जनतेच्या न्यायालयात येण्यास चेअरमन आणि काँग्रेस नेत्यांना भीती का वाटते, असा सवाल माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला. जिल्हा बँक सहकारी बँक न राहता देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेवेळी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. यावेळी नगराध्यक्ष संजयराज हलगरकर उपस्थित होते. यावेळी आमदार निलंगेकर म्हणाले, 'सहा महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका काँग्रेसकडून मांडली जात होती. मात्र, उमेदवारांच्या याद्या तयार करण्यापासून ते कोणत्या सोसायटीला थकबाकीत काढायचे, हे ठरवण्यापर्यंत सर्व निर्णय त्यांच्याच हातात असावेत, अशी भूमिका घेतली गेली. विरोधकांचे पॅनलच होऊ नये, ही काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांची मानसिकता आहे. युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा, यासाठी काँग्रेसकडून सर्व ताकद पणाला लावली जात आहे. मात्र, खरी अदालत ही जनतेची असून, जनतेसमोर आपली बाजू मांडण्याचे धैर्य बँकेतील सत्ताधाऱ्यांनी दाखवावे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘बिनविरोध निवडीची पोस्टरबाजी कसली?’

जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांना खऱ्या अर्थाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळायला हवे. त्यांनी अनेक लढाया लढल्या आहेत. १७ पैकी तीन मते वगळता उर्वरित सर्व मतदान त्यांच्या घरचेच असल्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाभर पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी कशासाठी केली जात आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी धीरज देशमुख यांना लगावला. अरविंद पाटील निलंगेकर हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरावेत, यासाठी पूर्ण ताकदीने कायदेशीर लढा देत आहेत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

samabhaji patil, dheeraj deshmukh
Latur DCC Bank: लातूर जिल्हा बँकेत महायुतीत फूट! धीरज देशमुखांचा दावा चोवीस तासांतच ठरला खरा

‘शेतकऱ्यांचा पैसा फिल्म इंडस्ट्रीत गेला’

जिल्हा बँकेचा कारभार शेतकऱ्यांच्या हितासाठी असायला हवा. मात्र, शेतकऱ्यांचा पैसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेला, असा गंभीर आरोप करत त्यांनी बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आणि सहकार क्षेत्रातील सर्वसामान्यांची संस्था आहे. तिच्यावर कोणत्याही एका कुटुंबाची मक्तेदारी असता कामा नये. जिल्हा बँकेच्या उभारणीत केवळ देशमुख कुटुंबीयांचे योगदान नसून जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था, शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे निवडणुकीला दिलदारपणे सामोरे जावे, संकुचित विचारातून राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

samabhaji patil, dheeraj deshmukh
Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध, फूट पडलेल्या महायुतीला काँग्रेसचा पहिला धक्का?

सत्तेच्या गैरवापराचा सहकारमंत्र्यांवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाचा आणि सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून दबाव-दमदाटीच्या माध्यमातून अनेक उमेदवारी अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही आमदार निलंगेकर यांनी केला. सहकारमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा खून करण्याचे काम केले आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. या प्रकरणामुळे सहकारमंत्र्यांना आपले पदही गमवावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

samabhaji patil, dheeraj deshmukh
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत सहकाराचा वेगळाच पॅटर्न; देशमुख-पवार एकत्र, भाजप आमदारांच्या सौभाग्यवतीही बिनविरोध!

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा काँग्रेसकडून ‘यूज अँड थ्रो’ पद्धतीने वापर केला जात आहे. त्यांनी काँग्रेसच्या या राजकीय सापळ्यात अडकू नये, असा सल्लाही आमदार निलंगेकर यांनी दिला. चेअरमन धीरज देशमुख यांनी जवळच्या आणि रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कर्ज दिल्याचा मुद्दा उपस्थित करत, याप्रकरणी चेअरमनसह अन्य सात जण अपात्र ठरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

‘व्हीआयपी कल्चरला जिल्ह्यात थारा नाही’

आम्ही सत्तेच्या विरोधात राहून ही निवडणूक लढवत आहोत. जिल्ह्यात व्हीआयपी कल्चर चालणार नाही. मी आजपर्यंतच्या निवडणुका ‘झिरो कॉम्प्रोमाइज’ भूमिकेतून लढवल्या असून, जिल्हा बँकेची निवडणूकही पूर्ण ताकदीने लढवणार आहे. ही निवडणूक आम्ही लावल्यामुळे आज देशमुखांना जनतेपर्यंत जाऊन हात जोडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या डोळ्यावरचे चष्मे निघाले, गाडीच्या काचा खाली झाल्या असेही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

samabhaji patil, dheeraj deshmukh
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत सहकाराचा वेगळाच पॅटर्न; देशमुख-पवार एकत्र, भाजप आमदारांच्या सौभाग्यवतीही बिनविरोध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.