Sudhakar Shringare: रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनात श्रृंगारे अवतरले अन् उमेदवारी फिक्स...

Latur Lok Sabha Elections 2024: लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून कोण? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
Sudhakar Shringare
Sudhakar ShringareSarkarnama
Published on
Updated on

Latur: भाजपने लातूर लोकसभा मतदारसंघातून (Latur Lok Sabha Elections 2024) दुसऱ्यांदा सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shringare) यांना उमेदवारी दिली. मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे, त्यांचा संपर्क कमी आहे, ते फारसे कुठे दिसत नाहीत, अशा सगळ्या कुमकुवत बाबी असताना या सगळ्यावर मात करत श्रृंगारे यांनी बाजी मारली. भाजपकडून लढण्यास अनेक इच्छुक असताना आणि पक्षश्रेष्ठींनी मात्र श्रृंगारे यांना पसंती दर्शवली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आॅनलाइन पद्धतीने लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे लोकार्पण झाले.

या कार्यक्रमात खासदार म्हणून सुधाकर श्रृंगारे यांच्या उमेदवारीसाठी पूर्वी आणि आता दुसऱ्यांदा आग्रह धरणारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हजर होते. या कार्यक्रमातील श्रृंगारे यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर त्यांना उमेदवारी फिक्स असल्याचे दर्शवत होता. काल (बुधवारी) प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.

आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार सुधाकरजी श्रृंगारे यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या कार्यकाळात लातूरमध्ये झालेल्या विकास कार्यांची ही पोचपावती असून, या वेळी 2019 पेक्षा अधिक बहुमताने ते पुन्हा संसदेत लातूरचे नेतृत्व करण्यासाठी जातील याची पूर्ण खात्री आहे, अशा शब्दांत निलंगेकर यांनी त्यांच्या उमेदवारीचे मनापासून स्वागत केले.

श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून कोण? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची पकड सैल होत चालली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसला अनेकदा उमेदवार आयात करावे लागले आहेत. या वेळीही परिस्थिती बदललेली नाही.

दुसरीकडे भाजपने गेल्या निवडणुकीत डॉ. सुनील गायकवाड यांना उमेदवारी देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते. 2019 मध्ये पक्षांतर्गत गटबाजीतून गायकवाड यांचा पत्ता कट झाला होता. भाजपने अनपेक्षितपणे चर्चेत नसलेल्या सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी दिली. श्रृंगारे हे जिल्हा परिषदेच्या वडवळ गटाचे सदस्य होते. तरीही अशा नवख्या आणि मोठी निवडणूक लढण्याचा अनुभव नसलेल्या श्रृंगारे यांना उमेदवारी दिली. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आपले वजन वापरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि श्रृंगारे सर्वाधिक 2 लाख 89 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. अर्थात तेव्हा देशात असलेली मोदी लाट याचा त्यात मोठा वाटा होता. या मतदारसंघात काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर हे सात वेळा निवडून आले आहेत. हा विक्रम जरी त्यांच्या नावे असला तरी सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम श्रृंगारे यांनी गेल्या निवडणुकीत केला होता. पण सुरुवातीच्या तीन-साडेतीन वर्षांत श्रुंगारे यांनी मतदारसंघाशी संपर्क न ठेवता भ्रमनिरास केला.

Sudhakar Shringare
Anup Dhotre: अनुप धोत्रे यांच्या रूपाने भाजपची युवा उमेदवाराला पसंती; वडिलांच्या जागी मुलाला उमेदवारी

दुसऱ्यांदा उमेदवारी कापली जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि गेल्या वर्षभरापासून ते मतदारसंघात पुन्हा दिसू लागले. वेगवेगळे कार्यक्रम, विकास कामांची उद्घाटने यावर त्यांनी भर दिला. श्रृंगारे यांचे पक्षातील सर्वच गटाशी संबंध चांगले होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला फारसा विरोध झाला नाही. पक्षा बाहेरही काँग्रेसच्या नेत्याशी श्रृंगारे यांचे ट्युनिंग चांगले होते.

अनेक कार्यक्रमांतून ते त्यांच्यासोबत दिसलेही. आपण विकासकामांच्या जोरावर पुन्हा उमेदवारी मिळवू, असे ते सांगत होते, अखेर त्यांचा दावा खरा ठरला. स्पर्धेत अॅड. विश्वजित गायकवाड यांचे नाव प्रामुख्याने समोर येत होते. पण पक्षाने त्यांचा विचार केला नाही. श्रृंगारे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन भाजप सलग तिसरा विजय म्हणजेच हॅटट्रिक साधणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com