Latur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन राजकीय घराणी पुन्हा आमने-सामने आली आहेत. दिवंगत विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे दोन पुत्र आमदार अमित आणि धिरज देशमुख, तर दुसरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आणि सख्खे बंधु आमदार संभाजी पाटील आणि अरविंद निलंगेकर. महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा देशमुख बंधू वर तर महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी निलंगेकर भावांवर टाकण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात या दोन राजकीय घराण्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच धार आली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे याची जणू देशमुख-निलंगेकरांमध्ये (Sambhaji Patil Nilngekar) स्पर्धाच लागली आहे. आमदार अमित देशमुख (Amit deshmukh) आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो असे सांगत प्रचार सभांमध्ये टाळ्या मिळवत आहेत. तर त्याला अरविंद पाटील निलंगेकर आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन लावून फेल करत असतो, असे प्रत्युत्तर देत आहेत. (Latur Loksabha Constituency News)
महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आंबुलगा-बु येथे नुकतीच सभा झाली. या सभेत आमदार धिरज देशमुख यांनी आम्ही ठरवलं की करेक्ट कार्यक्रम करत असतो, असे म्हणत निलंगेकर बंधूंना डिवचले. त्याच अंबुलगा गावात अरविंद पाटील निलंगेकर यांनी शनिवारी सभा घेत देशमुखांवर पलटवार केला. काँग्रेसचे युवराज येथे सभेमधून आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो असे गरजले.
परंतु, तुम्ही अहंकाराने बोलून करेक्ट कार्यक्रम करता, आम्ही करेक्ट कार्यक्रम नव्हे तर परफेक्ट नियोजन लावत असतो, असा टोला अरविंद निलंगेकर यांनी देशमुखांना लगावला. काही महिन्यापुर्वी आंबुलगा-बु साखर कारखाना मांजरा परिवाराने चालवण्यासाठी घेतला होता. कारखान्याच्या विक्रीची संपूर्ण प्रक्रिया पार पडण्याअधीच गुढी पाडव्याला आमदार अमित देशमुख, धिरज देशमुख यांनी मशनरीचे पुजन करताना `आम्ही कसा कारखाना घेतला, हे आम्हीच करू शकतो म्हणून असे म्हणत आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो, असा चिमटा काढला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंबुलगा साखर कारखाना देशमुखांच्या ताब्यात जाणे निलंगेकरांच्या राजकारणासाठी अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांनी वरिष्ठ स्तरावरून सुत्र हलवत पुन्हा बँकेकडून कारखाना विक्रीची निविदा काढून हा कारखाना ओंकार शुगर यांना चालवण्यासाठी मिळवून दिला. त्यामुळे घाई करत मशनरीचे पूजन करणारे देशमुख बॅकफुटवर गेले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एक नंबरचा उच्च शिक्षित उमेदवार कसा निवडून काढला? आता त्यांना निवडून आणून तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, असे आव्हान पुन्हा आंबुलगा-बु येथे धिरज देशमुख यांनी निलंगेकरांना उद्देशून दिले. यावर अरविंद पाटील निलंगेकर यांनी `तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, पण तुमच्या करेक्ट कार्यक्रम आम्ही परफेक्ट नियोजन लावून फेल कसे करतो, हे पहाच असा इशाराच दिला. नेत्यांच्या या करेक्ट कार्यक्रमात उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होऊ नये, म्हणजे मिळवले, अशी चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात होताना दिसते आहे.
(Edited By : Sachin Waghmare)