

जलील पठाण
BJP-Congress News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणातील माजी आमदार दिनकर माने नावाचा मोहरा भाजपाच्या गळाला लागला. कमळ हाती घेतल्यानंतर दिनकर माने चांगेलच आक्रमक झाले आहेत. गेली अनेक वर्ष काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्या राजकीय पाठिंब्यावर जिल्ह्यात अस्तित्व टिकवून असलेले माने आता त्याच देशमुखांवर आरोप करत तुटून पडताना दिसत आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर सूर बदलत माने यांची देशमुखांवरील ही नवी राजकीय झडप सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
माजी आमदार दिनकर माने यांच्या राजकीय वर्तणुकीतील 'यू-टर्न'ने औसा–लातूरच्या राजकारणात भूकंप आला आहे. ज्यांच्या मदतीवर राजकीय अस्तित्व टिकले, त्यांच्याविरुद्धच आता छाती ठोकून आरोप करण्याची माने यांची नवीन स्टाईल सध्या चर्चेत आहे. लातूरच्या देशमुख कंपनीने अनेकदा उघडपणे आणि छुप्या पद्धतीने माने यांना राजकीय पाठींबा दिला, हे सर्वश्रुत आहे.
अगदी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीशैल्य उटगे यांची उमेदवारी थांबवून माने यांना लढवण्यास 'फुल सपोर्ट' दिला, अशी चर्चा होती. ही खेळी देशमुख कंपनी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रचल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. परंतु जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन तोंडावर माने यांनी हातात कमळ घेतले आणि त्यांचा सूर पूर्णपणे बदलला.
आता ते देशमुखांवरच निशाणा साधत मारुती महाराज साखर कारखाना 156 कोटींच्या कर्जात बुडवला असा थेट आरोप करत आहेत. मात्र, याच कारखान्याला माने हे चेअरमन असताना दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांनी वाचवले, हे ते भाषणात सहजपणे विसरल्याची टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे. दिवंदत विलासराव देशमुखांची आठवण म्हणून कारखान्याला देशमुख कंपनीची मोठी आर्थिक–व्यवस्थापकीय साथ होती, याची स्थानिकांमध्ये अजूनही चर्चा होते. अगोदर टीका, नंतर नमते घेणे हा माने यांचा जुना पॅटर्न असल्याची टीका आता अधिक तीव्र झाली आहे.
मारुती महाराज कारखान्याची सर्वसाधारण सभा कारखाना साईटवर न घेता औशात घेतली जात असल्याचा आरोप माने यांनी केला आहे. याची कारणे त्यांनी सांगितली आहेत ती सभासद कमी यावेत आणि नवीन नियमांनुसार गैरहजर राहणाऱ्या सभासदांचा मतदान हक्क संपुष्टात यावा, असे काहींचे राजकीय समीकरण असल्याचे माने हे सांगत आहेत. एकूणच कारखाना व्यवस्थापक हे सभासदांना जाणून बुजून बाजूला बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ते करीत आहेत.
औसा तालुक्याचे राजकारण आजही देशमुख कुटुंबाभोवती फिरते, हे कोणी नाकरणार नाही. ज्यांनी स्वत: माने यांना भाजपात हात धरून आणले ते अभिमन्यू पवार आणि त्यांचे देशमुखांशी असलेले उत्तम संबंध सगळ्यांना माहीत असताना माने यांनी देशमुखांना काढलेला चिमटा त्यांच्या आगामी राजकारणाला महागात पडणार, अशी चर्चा आहे. कारण औसा–लातूर कारखानदारीत दिलीपराव देशमुख हे माहीर मानले जातात. भविष्यात गुळपेटी कारखाना असलेल्या माने यांना त्यांची गरज पडणारच. भाजपात गेलो म्हणजे देशमुखांची गरज संपली, असा समज माने यांचा असेल तर तो त्यांच्यासाठी सर्वात मोठा राजकीय भ्रम ठरेल, अशी भावना देशमुखांवरील टीकेनेतर व्यक्त होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.