
OBC leadership caste language controversy : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आंदोलनाच्या नेतृत्वावरून केलेल्या जातीय भाष्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून लक्ष्मण हाकेंनी सावरासावरी केली असली, तरी हाके त्यावरून टीकेचे धनी होऊ लागले आहे.
त्यांचे जुने सहकारी नवनाथ वाघमारे यांनी टायमिंग साधत, हाकेंच्या तोंडून अशी वक्तव्य निघणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे तर, बीडमधील मराठा आरक्षण आंदोलनातील समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाकेंची जीभ हासडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचं जाहीर केलं आहे.
लक्ष्मण हाके नांदेड, लातूर हिंगोली परभणी जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ओबीसी (OBC) समाजाच्या नेतृत्वावरील हा व्हिडिओ आहे. यावरून लक्ष्मण हाके वादात सापडले आहे. या वादग्रस्त व्हिडिओवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकेकाळी लक्ष्मण हाके यांचे जुने सहकारी नवनाथ वाघमारे यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
'ज्या माळी समाजाने नवनाथ वाघमारे यांच्या अगोदर लक्ष्मण हाके यांचा सत्कार केला, सन्मान केला. त्या लक्ष्मण हाकेंच्या तोंडून अशी वक्तव्य निघत असतील तर खरंच दुर्दैव मानाव लागेल', असा टोला नवनाथ वाघमारे यांनी लगावला आहे. कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, त्याला काम करत राहावं लागतं, छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) ओबीसीचं काम केल्याने भुजबळांकडे ओबीसींचा 'मसीहा' म्हणून पाहिलं जातं, असा टोलाही वाघमारे यांनी लगावला आहे.
'आज तुम्हाला भुजबळांची जागा घ्यावी वाटत असेल तर, हे दुर्दैव आहे. उलटं-सुलटं बोलून ही जागा कुणाला घेता येणार नाही. ओबीसींचा नेतृत्व माळ्याकडे म्हटल्यापेक्षा तुम्ही माळी-धनगर-वंजारी, असं आणता का? जो काम करेल त्याला नेतृत्व मिळत असतं', असेही नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. माझी लक्ष्मणरावांना विनंती आहे, तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल, तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असा सल्ला देखील वाघमारेंनी दिला.
'आम्ही मागील दीड वर्षात सोबत फिरत असताना लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही. त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात त्यांचे जिथे सहकारी आहे, तिथे माझा अवमान अनेक ठिकाणी झाला', असा गौप्यस्फोट देखील नवनाथ वाघमारे यांनी केला. लक्ष्मणरावाचा तिथे सन्मान व्हायचा, तिथे माझा सन्मान होत नव्हता. परंतु मी कधीही ती गोष्ट बोलून दाखवली नाही. समाजाला नाव ठेवण्याचा अधिकार लक्ष्मण हाके यांना कोणी दिला नाही. लक्ष्मण हाके यांनी नाव ठेवून अत्यंत चुकीचं केलं आहे, असेही वाघमारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर बीडमधील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण हाके यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना, गंगाधर काळकुटे यांनी आक्षेपार्ह विधान केले. लक्ष्मण हाके यांची जीभ कापणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. हाके यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केले होते. यामुळे महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाके यांनी सावरासावर केली आहे. ते म्हणाले, "ओबीसीमध्ये फूट पाडणे, ओबीसीमधील प्रमुख दोन जातीत फूट पाडून ओबीसी चळवळ डॅमेज होईल, हा षडयंत्राचा भाग आहे. ओबीसींच्या जवळपास साडेचारशे जातीची भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने बोलणं म्हणजे, एवढा पण लक्ष्मण हाके मूर्ख नाही किंवा माझी एवढी पण वैचारिक दिवाळखोरी नाही. गावगाड्या मधला ओबीसी एकत्रित येण, त्यांना संघटित करणं हा एवढाच प्रोग्राम माझ्या समोर आहे."
"माझ्या ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, यापुढे अशा पद्धतीने प्रयोग होणार आहेत, या अगोदर देखील, असे प्रयोग झालेले आहेत. माझी गाडी देखील फोडण्यात आली आहे. मला मारहाणीचा देखील प्रयत्न झालेला आहे. ओबीसी चळवळीमध्ये फूट पडेल किंवा ओबीसी चळवळ डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असेल तर, ओबीसी बांधवांनी ते करू नये. आपला शत्रू खूप आक्राळ-विक्राळ आहे. आपलं आरक्षण संपल्यात जमा आहे, त्यामुळे ओबीसी बांधवांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी सज्ज व्हावे," असे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.