NCP Politics : आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. अजितदादा शब्दाला पक्के आहेत, असे सांगत त्यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही चिखलीकर म्हणाले. आता नेमकं चिखलीकरांना मंत्रीपद कधी मिळणार? याची प्रतिक्षा त्यांच्या समर्थकांना लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात नंबर एकवर नेण्याचा विडा चिखलीकरांनी उचलला आहे. इतर पक्षातील महत्वाचे नेते, माजी मंत्री, आमदारांना पक्षात आणत त्यांनी अजित पवारांचा विश्वास जिंकला आहे.
पण त्यांची खरी परीक्षा आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) कामगिरी कशी राहते? सत्ता येते का? यावर प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रीपदाची संधी मिळणार की नाही? हे अवलंबून असणार आहे. चिखलीकरांनी मंत्रीपदाच्या चर्चेला सुरवात करून दिली असली तरी अजित पवारांकडून काही मिळवणे इतके सोपे नाही, याची जाणीव चिखलीकर यांनाही आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षांतर केले. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानेच त्यांनी हा प्रवेश केल्याचे त्यांच्या कन्या प्रणिता चिखलीकर यांनी सांगितले होते. अनेकदा पक्षांतर केल्यामुळे आपली मंत्रीपदाची संधी हुकली, अशी सल प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. मात्र प्रत्येक पक्षात 'तुम्ही नव्हे आहात, आता थांबा' ही परंपरा अजित पवार खंडीत करतील, असा आशावाद चिखलीकर बाळगून आहेत.
पहिली लढाई जिंकले..
प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवत विजय मिळवला. लोहा-कंधार या आपल्या हक्काच्या मतदारसंघात विजय मिळवणे त्यांच्यासाठी अवघड नव्हतेच. परंतु त्यांचा खरा कस लागला तो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढवताना. महायुतीत शिवसेना-भाजपासारखे मोठे पक्ष असताना चिखलीकर यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसचे चार माजी आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बडे नेते पक्षात आणले, तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मोहिम चिखलीकरांनी फत्ते केली, तर मग त्यांचे मंत्रीपद पक्केच म्हणावे लागेल. आगामी निवडणुकीत महायुती म्हणून समोर जाताना चिखलीकर यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. अशोक चव्हाण आणि भाजपसोबतच काँग्रेस, महाविकास आघाडीला टक्कर देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे मोठे आव्हान चिखलीकर यांच्यासमोर असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक करण्याच्या मोहित इतर पक्षातून बडे नेते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत, अजून आपण भाजपकडे वळलो नाही, असे सांगत चिखलीकरांनी आपला प्रचंड आत्मविश्वास दाखवून दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.