Beed News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह देवदर्शनांनी जिल्ह्यात दौऱ्याची सुरूवात केली आहे. पंकजा आणि प्रीतम मुंडेकडून ( Pritam Munde ) प्रमुख नेत्यांच्या भेटी-गाठींचा सिलसिला सुरू आहे. आता गेवराई मतदार संघासाठी पंकजा मुंडेंनी 'सुवर्णमध्य' फॉर्म्युला काढला आहे.
एकेकाळचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित ( Amarsingh Pandit ) यांच्या घरी पंकजा मुंडेंनी भेट दिली. तसेच, भाजपचेच आमदार पण अमरसिंह पंडितांचे विरोधक लक्ष्मण पवार ( Laxman Pawar ) यांच्या घरीही पंकजांनी भेट दिली. त्या येवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर या दोघांचे विरोधक आणि शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित ( Badamrao Pandit ) यांच्या घरीही भेट दिली. आता या सर्वाचे फलित काय निघणार हे मतमोजणीनंतरच कळेल.
भाजपनं महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांची बीडसाठी उमेदवारी निश्चित केली. सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्याने कुठेतरी माशी शिंकलीय हे निश्चित झालं. 13 मार्चला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 22 मार्चला पंकजा मुंडेंचं जिल्ह्यात आगमन झाले. आष्टी तालुक्यातील स्वागतानंतर त्यांनी गहिनीनीनाथ गड, भगवान भक्तीगड व नंतर श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रमुख नेत्यांच्या भेटी - गाठींचा सिलसिला सुरु केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडेंनी बीडला माजी मंत्री शिवाजीराव पंडित व राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या 'शिवछत्र' निवासस्थानी भेट दिली. तब्बल 15 वर्षांनी पंडित-मुंडे यांच्यातील ही राजकीय भेट होती. कारण, पंकजा मुंडे व अमरसिंह पंडित हे कट्टर राजकीय विरोधक होते. 2009 मध्ये प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणुकीची धुरा अमरसिंह पंडितांवर होती. पण, त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारीवर उभारलेल्या अमरसिंहांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला काही भाजप नेत्यांनीच हातभार लावल्याने मुंडे-पंडितांमध्ये राजकीय कटुता निर्माण झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात पंडित कुटुंबावर दाखल झालेले गुन्हे असतील किंवा 'जय भवानी कारखान्या'ला कर्ज मिळण्यात आलेले अडसराला पंडित-मुंडे राजकीय विरोधाची किनार होती.
2009 नंतर पंकजा मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्या राजकीय भेटी झाल्याच नव्हत्या. पाच महिन्यांपूर्वीही पंकजा मुंडे यांनी पंडितांच्या 'शिवछत्र'वर भेट दिली होती. पण, त्याचे कारण राजकीय नव्हे, तर मराठा आरक्षण आंदोलनातील जाळपोळ, दगडफेकीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीचे होते. आता पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार तर अमरसिंह पंडित राष्ट्रवादी या महायुतीच्या मित्रपक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. दोन महिन्यांपूर्वी महायुतीच्या मित्रपक्षाच्या संमेलनाचे प्रमुखपदही त्यांच्याकडे होते. त्यांच्याच पुढाकाराने झालेल्या मित्रपक्षांच्या मेळाव्यात डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अमरसिंह पंडिता यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले होते. मात्र, आता चित्र बदलले आणि पंकजा मुंडे रिंगणात उतरल्या. त्यामुळे त्या पंडित यांच्या घरीही भेटीला गेल्या.
पंकजा मुंडे केवळ अमरसिंह पंडित यांच्या घरी भेटीवर थांबल्या नाही तर पंडित यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याही गेवराईच्या घरी भेट दिली. त्यानंतर अमरसिंह पंडित व लक्ष्मण पवार यांचे राजकीय विरोधक आणि शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या घरीही पंकजा मुंडे यांनी भेट दिली. बदामरावांनीही त्यांचे आदरतिथ्य केले. तसे, पूर्वीपासूनच बदामराव पंडित व पंकजा मुंडे यांचे वेगवेगळ्या पक्षात असूनही राजकीय संबंध चांगले राहिलेले आहेत. "उमेदवार प्रत्येकाला भेटतच असतो," अशी प्रतिक्रीया बदामराव पंडित यांनी दिली आहे. आता निवडणुकीत बदामराव पंडित आपले राजकीय वजन पंकजा मुंडे यांच्या पारड्यात टाकणार का? महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकणार हे पाहणे महत्वाचे आहे.
एकमेकांचे कट्टर राजकीय पंडित-पवार या तिघांना भेटून गेवराईसाठी 'सुवर्णमध्य' काढण्याचा पंकजा मुंडेंनी प्रयत्न केला. तरी मतदारांच्या मनात काय हे मतमोजणीच्या आकड्यांतून दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.