Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याने सत्ताधारी महायुतीला असा काही झटका दिलायं की त्यामुळे राज्यातील वातावरण हादरून गेले आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट अशा कायम नैसर्गीक आपत्तीला तोंड देणाऱ्या मराठवाड्याकडे सरकारने कायम दुर्लक्ष केले. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारला मराठवाड्याने विरोधकांवर मतांचा पाऊस चोख उत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. यात केंद्रीय राज्यमंत्री पासून ते भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यापर्यंत सगळ्यानाच मराठवाडी दणका बसला. शेतकऱ्याच्या कापूस, सोयाबीनला नसलेला भाव, पीक कर्जाअभावी होणाऱ्या आत्महत्या, नापिकी, अवकाळी, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची न मिळालेली भरपाई या मुद्यांवरून असलेली नाराजी मतांच्या रुपात बाहेर पडली.
या शिवाय गेल्या आठ-दहा महिन्यापासून राज्यभरात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्याने विशेषतः मराठवाड्यात सरकार विरोधात रोष दाखवून दिला. दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याने सरकारविरोधात मतांचा पाऊस पाडताना मात्र हात आखडता घेतला नाही, हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्याचा वर, त्यांना मिळालेल्या मतांवर नजर टाकली तर स्पष्ट होते.
लोकसभेच्या जालना मतदारसंघात सलग सहाव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. तो ही थोड्या मतांनी नाही तर तब्बल 1 लाख 9 हजार 958 च्या फरकांनी. महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गट-महाविकास आघाडीचे संजय जाधव सलग तिसऱ्यांदा विजयी झाले.
त्यांच्याविरोधात महायुतीने रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्यांच्यासाठी सभा घेतल्यानंतरही त्यांचा 1 लाख 34 हजार 61 मतांच्या फरकाने पराभव झाला. नांदेड (Nanded) लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवाय महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर हे गेल्यावेळचे विद्यमान खासदार होते.
मोदींनी त्यांच्यासाठीही नांदेडमध्ये येऊन सभा घेतली होती. पण तिथेही भाजपच्या नशिबी पराभवच आला. काँग्रेस-महाविकास आघाडीच्या वसंत चव्हाण यांनी त्यांचा 59 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला. लातूर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने भाजपकडून खेचून घेतली. दोन टर्म खासदार राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांचा तिथे महाविकास आघाडीच्या शिवाजी काळगे यांनी दारुण पराभव केला. 61 हजार 881 मतांची आघाडी घेत ही जागा काँग्रेसने जिंकली.
धाराशिव मतदारंसघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तर रेकाॅर्ड ब्रेक केला. महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यावर त्यांनी तब्बल 3 लाख 29 हजार 848 इतक्या दणदणीत मतांनी पराभव केला. हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha Constituency) मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट-महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या बाबुराव कदम यांचा 1 लाख 8 हजार 602 मतांच्या फरकाने पराभव केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सात मतदारसंघात मिळालेले मताधिक्य पाहिले तर सरकारच्या विरोधात रोष स्पष्ट होतो. मराठवाड्यातील एकमेव छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. संदीपान भुमरे यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा 1 लाख 35 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या एका विजयामुळे महायुतीची पत राखली गेली असेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.