Nanded Lok Sabha Constituency : चिखलीकरांच्या पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण स्वीकारणार का?

Ashok Chavan and Pratap Patil Chikhalikar : लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Ashok Chavan, pratap Patil Chikhalikar
Ashok Chavan, pratap Patil ChikhalikarSarkarnama

Nanded Loksabha Constituency : मराठवाड्यातील आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचा दारुण पराभव झाला. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांनी 59 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सुरुवातीपासून नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा होती, पण चव्हाण यांच्या प्रवेशानंतर ती सेफ झोनमध्ये गेल्याचा दावा केला जात होता. जिल्ह्यात दोन खासदार आणि चार आमदारांची फौज असूनही महायुतीला ही जागा भाजपला (BJP) राखता आली नाही. राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. अशी मागणी त्यांनी दिल्लीतील नेत्यांकडे केली आहे.

आता फडणवीसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नांदेडच्या पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण स्वीकारतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2014 मध्ये देशभरात मोदी लाट असताना तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा जिंकत इतिहास घडवला होता. पण तशी कामगिरी त्यांना 2019 मध्ये करता आली नाही.

2024 च्या निवडणुकीआधी पक्षांतर करत भाजपच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला. मोदींच्या गॅंरटीवर विश्वास दाखवला आणि नांदेड लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची गॅंरटी दिली. पण देशात जशी मोदी गॅरंटी चालली नाही, तरी चव्हाण यांची गॅंरटी नांदेडकरांनी (Nanded Loksabha) नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ashok Chavan, pratap Patil Chikhalikar
Beed Lok Sabha News : जावयाचा पराभव करणाऱ्या सोनवणेंच्या विजयासाठी राजेसाहेबांनी केले जिवाचे रान !

जिल्ह्यातील ज्या भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अशोक चव्हाण करत होते, त्या मतदारसंघातून चिखलीकर यांना फक्त 841 मतांची आघाडी मिळाली. इथे काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना 84390 तर चिखलीकरांना 84331 मते मिळाली. या शिवाय मुखेड मतदारसंघातील 3996 मतांची आघाडी सोडली तर नांदेड उत्तर, दक्षिण, नायगाव, देगलूर या चारही विधानसभा मतदारसंघात चिखलीकर पिछाडीवर आहेत.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महिनाभर संपुर्ण जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सोहळे घडवून आणले जात होते. मात्र याचा काडीचा फायदा प्रताप पाटील चिखलीकर यांना झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याची नाराजी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकार विरोधात असलेली नाराजी असा दुहेरी फटका चिखलीकरांना बसला.

Ashok Chavan, pratap Patil Chikhalikar
Jalna Lok Sabha 2024 Analysis: सत्तार-भुमरे यांच्याकडूनही रावसाहेब दानवेंचा 'करेक्ट' कार्यक्रम..

तर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना सहानुभूतीचा फायदा झाला. वर्षानुवर्ष काँग्रेसला मतदान करणाऱ्या नांदेडमधील पारंपारिक मतदारांनी पक्ष सोडणाऱ्या अशोक चव्हाण यांची साथ सोडल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. आता या पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण स्वीकारतात का? आणि त्याचे प्रायश्चित्त कोणत्या स्वरुपात घेतात? हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com