
BJP News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 132 पेक्षा जास्त आमदार निवडून आल्याने भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. महायुतीची सत्ता आणि मुख्यमंत्री पद पक्षाकडे आल्याने भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते स्वबळाची भाषा करायला लागले आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढवणार, असे बोलणाऱ्या नेत्यांची भाषा आता बदलली आहे.
भाजपाचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच दृष्टीने आमची चर्चा सुरू असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाने आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. संभाजीनगरमध्ये तर स्थानिक पदाधिकारी, नेते युतीतील घटक पक्षांना न जुमानता आम्ही स्वबळावरच लढणार, असे जाहीरपणे सांगू लागले आहेत.
भाजपामधील (BJP) पदाधिकारी, छोट्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी आम्ही स्वबळावर लढणार, असा दावा स्थानिक नेते करत आहेत. सत्ताधारी शिवसेनेने मात्र संयमित भूमिका घेत एमआयएमला रोखण्यासाठी आपण भाजपला महापालिका निवडणूक युती म्हणून लढण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतरही भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह इतर स्थानिक नेते स्वबळावर ठाम होते.
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळाचा नारा देऊ केला होता. परंतु प्रमुख नेत्यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत हे स्वबळाचे अवसान गळून पडले आणि आता महाविकास आघाडीनेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात काही दिवसांपुर्वी सांगितले होते.एकूणच विधानसभा निवडणुकीत बहुमतासह मिळालेली सत्ता आणि वाढलेली आमदारांची संख्या पाहता भाजपाचे विमान हवेत उडत आहे.
आशिष शेलार यांनी मात्र काल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती एकत्रित लढणार असल्याचे सांगून हे हवेत उडणारे विमान जमिनीवर आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शेलार यांनी महायुती एकत्रित लढणार असे जरी आज सांगितले असले, तरी अजून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात आणखी काय राजकीय समीकरणे बदलतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.