BJP News : राज्यातील पाच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे जागा वाटप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेल्या दोन बैठकांमध्ये ठरले आहे. ज्याच्याकडे विद्यमान जागा आहे, ती त्याच पक्षाने महायुतीत लढावी, असा निर्णय झाला आहे. याची अधिकृत घोषणा आमच्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लवकरच करतील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हेच लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही असलेले भाजपचे (BJP) माजी आमदार व पदवीधरसाठी इच्छुक असलेल्या संजय केनेकर यांच्या मनसुब्यावर मात्र या निर्णयाने पाणी फिरले आहे. भाजपने केनेकर यांच्यावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या संयोजक पदाची जबाबदारी सोपवली होती. दोन लाख मतदारांची नोंदणी केल्याचा दावा करत संजय केनेकर हे पाच दिवसापासून मुंबईत तळ ठोकून होते.
मात्र महायुतीला कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी घेत राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी काळजी घेत आपापल्याकडे असलेल्या जागा राखत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनूसार तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असणार आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर तीन टर्मपासून पकड राखून असलेल्या सतीश चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा संधी दिली आहे. सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना विरोध असून मैत्रीपूर्ण लढत झाल्यास भाजपा ही जागा पुन्हा खेचून आणू शकते, असा दावा संजय केनेकर यांच्यासह काही स्थानिक पदाधिकार्यांनी मुंबईत नेत्यासमोर केला होता.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच उमेदवाराविरुद्ध लढण्यासाठी पक्ष बदलणाऱ्या सतीश चव्हाण यांना धडा शिकवण्याची हीच संधी असल्याचेही सांगण्यात आले. परंतु महायुतीतच लढण्याचा निर्णय झाल्याने गेल्या दोन वर्षापासून भाजपने मतदार नोंदणीसह केलेल्या जय्यत तयारीवर आता पाणी फिरले आहे.
भाजपचे कमळ नसणार..
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत भाजपविरुद्ध राष्ट्र्वादी-काँग्रेस आघाडी, महाविकास आघाडी अशी लढत झाली होती. 2008 पूर्वी हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचे ताकदीने प्रतिनिधित्व केले होते.
त्यानंतर मात्र सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत तिसऱ्यांदा बाजी मारली होती. 2026 मध्ये होणारी ही निवडणूक मात्र पहिल्यांदाच मराठवाड्यात भाजपच्या कमळ चिन्ह आणि उमेदवाराशिवाय लढली जाणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना मात्र याचे शल्य कायम बोचत राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.