

महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असतानाही महायुतीतील चर्चा निष्फळ ठरत आहेत.
मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात एकमत होऊ शकलेले नाही.
लातूरमध्ये मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युती जुळण्याची शक्यता दिसून येते.
Latur BJP-NCP News : महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. परंतु राज्याच्या सत्तेत असणाऱ्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युतीच्या चर्चा आणि गुऱ्हाळ काही केल्या संपत नाहीये. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीत युतीसाठीच्या आतापर्यंतच्या बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. मात्र लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे जमतयं असे चित्र आहे.
लातूर महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रभारी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश अप्पा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांच्यात युतीसाठीची बैठक नुकतीच पार पडली आहे. ही बैठक सकारात्मक झाली असून लवकरच युतीची घोषणा केली जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. लातूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात सकारात्मक बैठक पार पडली.
याबैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच याबाबत एकमत झाले तर लवकरच या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, रमेशअप्पा कराड, विक्रम काळे, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व्यंकटजी बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विलास गुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे बैठकीला उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेत. मात्र नगरसेवकांची संख्या ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिक आहे. मतदारांचा राष्ट्रवादीकडे वाढत असलेला हा कल पाहता महापालिकेत युतीसाठी भाजपने पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा नगरपालिकेतील सत्ता राखल्यानंतरच लातूर महापालिकेसाठी दंड थोपटले होते. त्या दृष्टीने राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीतील चर्चा आणि युतीच्या निर्णयावर सकारात्मक पावलं उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लातूरमध्ये पहिल्याच बैठकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या निर्णयाप्रत पोहचली आहे. इकडे जालना, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र युतीची चर्चा पुढे सरकतांना दिसत नाहीये. संभाजीनगरमध्ये भाजपचे काही नेते युतीमध्ये मीठाचा खडा टाकल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर भाजपने 2015 चा फॉर्म्युला आता चालणार नाही. फिप्टी फिप्टीवरच चर्चा होईल, अन्यथा युती होणार नाही, अशी स्पष्ट भुमिका भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी घेतली आहे. त्यामुळे इथे युतीची चर्चा ठप्प आहे.
जालन्यात हीच परिस्थिती आहे, शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला अल्टीमेटम दिला आहे. दोन महिन्यापासून दिलेल्या प्रस्तावावर काहीच प्रतिसाद न देणाऱ्या भाजपसोबत आता पुढे जाणे शक्य नाही. युती तोडल्याचे पाप आमच्या माथी नको, आमच्यासाठी आता सर्व पर्याय खुले आहेत, अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आम्हाला वर्ज नाही, असा इशारा भाजपला दिला आहे. बहुदा आजचा दिवस वाट पाहून उद्या, अर्जुन खोतकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नांदेड महापालिकेत युतीसाठी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांशी युती करण्यास उत्सूक नसल्याचे बोलले जाते. खासदार अशोक चव्हाण यांना महापालिकेवर एकहाती सत्ता हवी आहे. नगरपालिकेत वर्चस्व कायम राखल्यानंतर चव्हाण आता महापालिकेत स्वबळाचाच प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहेत.
अशोक चव्हाण युती करणार नाही, याची खात्री शिवसेनेला पटल्यामुळे त्यांचे आमदार हेमंत पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी सुरू केली आहे. परभणीतही अशीच अवस्था आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपडूकर यांनी अद्याप एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युतीसाठी बोलणी सुरु केलेली नाही.
1) महायुतीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत?
👉 भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).
2) कोणत्या भागात युती चर्चा फिस्कटल्या?
👉 जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी येथे.
3) लातूरमध्ये काय वेगळे चित्र आहे?
👉 लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहेत.
4) या मतभेदांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
👉 जागावाटप न ठरल्यास सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत फटका बसू शकतो.
5) महापालिका निवडणुकांसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली?
👉 मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.