Maratha Reservation News : जरांगेंची सरकारला अजून एक संधी ; चर्चेला या, एकदाचं आरक्षण द्यायचं का नाही ते सांगा ?

Maharashtra News : फडणवीस यांनी चर्चा माईकसमोर होऊ शकत नाही, समोरासमोर करावी लागले, तेव्हाच प्रश्न सुटेल असे म्हटले होते.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चर्चा माईकसमोर होऊ शकत नाही, तुमचे दहा, शंभर लोक घेऊन या, आम्ही येऊ समोरासमोर चर्चा करू, काही उपाय आम्ही सुचवू काही गोष्टी तुम्ही सांगा, यातूनच मार्ग काढता येईल, असे आवाहन मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil News) यांना उद्देशून केले होते. यावर मराठा आरक्षणाशिवाय एकाही राजकीय नेत्याला अंतरवालीत पाय ठेवू देणार नाही, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

Maratha Reservation News
Maratha Reservation: मराठा आरक्षण का टिकलं नाही? शंभूराज देसाईंना नक्की म्हणायचं काय...

पण सरकारने आपल्यावर चर्चाच केली नाही म्हणून खापर फोडू नये, यासाठी जरांगे यांनी सरकारला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Jalna) अंतरवाली येथील उपोषण स्थळावरून जरांगे यांनी थरथरत्या हाताने माईकवून सरकारला चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे. आज, उद्या तातडीने चर्चेला या, तुम्हाला एकही मराठा आडवणार नाही. (Maratha Reservation) फक्त एकदाच तुम्हाला आरक्षण द्यायचे की नाही, ते सांगा बाकीची वळवळ नाही करायची, अशा शब्दांत त्यांनी सरकारसाठी चर्चेची द्वारे खुली केली आहेत.

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीतून आरक्षण या मागणीसाठी २८ आॅग्स्टपासून जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांना अतंरवालीत बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर प्रकरण चिघळले आणि राज्यभरात याचे पडसाद उमटले. (Maharashtra) त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चार-पाचवेळा चर्चा केली. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत येऊन जरांगे यांच्याकडून मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र व ओबीसीमधून आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी संपुर्ण राज्याचा दौरा केला. सरकारला दिलेली महिन्याची मुदत संपल्यानंतर अंतरवालीत भव्य जाहीर सभा घेतली. त्यानंतर पुन्हा दहा दिवसांची अतिरिक्त मुदत संपल्यानंतर पुन्हा बेदमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अन्न-पाणी त्याग केल्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालवत आहे. ते वैद्यकीय उपचारही घेत नसल्याने राज्यात पुन्हा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरू झाले आहे. कुठे हिंसक तर कुठे साखळी आणि आता बेमुदत उपोषणाने सरकरावर दबाव वाढवला जात आहे. राज्यातील सहाशेहून अधिक गावांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. नेते, मंत्री, आमदार, खासदार यांचे ताफे अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले जात आहे.

अशा परिस्थितीत सरकारने जरांगे यांनी चर्चा करावी, असे आवाहन केले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा माईकसमोर होऊ शकत नाही, समोरासमोर करावी लागले, तेव्हाच प्रश्न सुटेल असे म्हटले होते. याचाच संदर्भ देत जरांगे यांनी आज अंतरवाली येथून जाहीरपणे माईकवरून सरकारला चर्चेला येण्याचे आवाहन केले. आज या, उद्या या तातडीने चर्चेसाठी या तुम्हाला एकही मराठा अडवणार नाही. एकदाच येऊन आरक्षण देणार का नाही? ते सांगा उगाच दुसरी वळवळ नाही करायची, एवढे बोलून त्यांनी विषय संपवला. आता जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकराकडून चर्चेसाठी कोण येणार का? हे पहावे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com