Beed News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे पाटील आपल्या आई - वडिलांसह मातृभूमीचे आशिर्वाद घेऊन रविवारी मुंबईकडे रवाना झाले. मात्र, शनिवारची अर्धी रात्र आपल्या भूमिपुत्राला पाहण्यासाठी एक वर्षाच्या चिमुकल्यांसह लेकुरवाळ्या, ८० वर्षांच्या वृद्धा थंडीत मातोरीत बसून होत्या. यात्रेचे जागोजागी जंगी स्वागत झाल्याने नियोजित वेळेपेक्षा त्यांना सात तासांहून अधिक उशिरा झाला होता.
मराठा समाजाला (Maratha Reservataion) कुणबी आरक्षणाची मागणी करत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी बीडला अंतिम इशारा सभा घेऊन मुंबईला उपोषणाची घोषणा केली. त्यांच्या अंतरवाली सराटी - मुंबई आरक्षण उपोषण यात्रेचा पहिला मुक्काम शनिवारी त्यांचे मुळगाव मातोरीत होता.
अंतरवालीहून निघालेल्या यात्रेचे जागोजागी जंगी स्वागत झाल्याने नियोजित वेळेपेक्षा सात तासांहून अधिक उशिरा ते गावी पोचले. तोफांच्या गजरात फेरीवर २५ जेसीबींतून पुष्पवृष्टी करुन गावात त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषण यात्रेच्या मुक्कामस्थळी परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे यांच्या सोबत असंख्य समाज बांधव होते. तत्पूर्वी त्यांना पाहण्यासाठी व भाषण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती. एक वर्षाच्या चिमुकल्यांना घेऊन लेकुरवाळ्या महिलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धाही मातोरीत आल्या होत्या. कडाक्याच्या थंडीत ही मंडळी या मैदानावर विसावली होती. वृद्धांनी जमिनीला अंथरुन आणि अंगावरच्या लुगड्यालाच पांघरुन केले.
(Edited By : sachin waghmare)