
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना ‘कट्टर बना’ असा सल्ला देत पैशासाठी झुकू नका, असे आवाहन केले.
त्यांनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष निशाणा साधत मराठा समाजाशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला अधिक जोम देण्यासाठी त्यांनी समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.
Maratha reservation news : ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर मराठा समाजाचा खरा शत्रू कोण? हे उघड झाले आहे. त्यामुळे कट्टर बना मराठ्यांच्या लेकरांच्या अडचणी दूर करायच्या आहेत, दोन-चार हजारांसाठी कोणाच्या मागे पळू नका, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांची कानउघडणी केली.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठा समाज काँग्रेसच्या (Congress) पाठीशी उभा राहिला. यानंतरही राहुल गांधी सांगतात म्हणून विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. मराठा समाजाने केलेल्या मदतीची अशी परतफेड आहे का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवू, अशा थेट इशाराही त्यांनी दिला.
ऐन दसरा मेळाव्याच्या आदल्यादिवशी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना नीट बोलताही येत नव्हते, अशा परिस्थितीत नारायण गडावरील दसरा मेळावा होणार का? ते भाषण करणार का? अशा चर्चा राज्यभरात सुरू होती. मात्र मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावर गेले आणि त्यांनी विरोधकांना अंगावर घेत आक्रमक भाषणही केले. त्यांच्या या भाषणाचे राजकीय पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत.
नारायण गडावरील दसरा मेळाव्यानंतर मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त उपचार घेत आहेत. राज्यातील घडामोडी, ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणावर सातत्याने होणारी टीका या संदर्भात जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाच्या नेत्यांवर टीका करताना मराठा समाजातील लेकरांच्या भल्यासाठी कट्टर बना, दोन-चार हजारासाठी किंवा काही लाखांच्या कामासाठी नेत्यांची हुजरेगिरी करू नका. त्यांच्या मागेपुढे पळू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर आता रद्द करणे सरकारलाही शक्य नाही. ओबीसी नेत्यांचे ऐकून मराठा पोरांचे नुकसान होईल, असे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नयेत.
या टोळीचे धंदे काय आहेत? हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे. या बैठकीला जाणारे नेते हे ओबीसींचे नव्हे तर त्यांच्या जातीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत, असा आरोपही मनोज जहांगे पाटील यांनी केला.मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीच आहे. त्यानुसार शासनाने प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी. संभाजीनगर आणि जालन्यात दोन लाख 24 हजार कुणबी होते ते अचानक कुठे गेले? याचे उत्तरही द्यावे.
हैदराबाद गॅझेटच्या आधारावर काढलेला कुणबी प्रमाणपत्राचा जीआर रद्द करणे आता सरकारलाही शक्य नाही. त्यावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मेळाव्यावर तसेच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, विजय वडेट्टीवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली.
1. मनोज जरांगे पाटलांनी कोणाला इशारा दिला?
मनोज जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांना आणि काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला.
2. त्यांनी कोणता संदेश दिला?
त्यांनी नेत्यांना कट्टर राहण्याचे आणि पैशासाठी आंदोलन सोडू नये, असा संदेश दिला.
3. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
हे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरमध्ये केले.
4. काँग्रेसबाबत जरांगे पाटलांचे मत काय आहे?
त्यांनी काँग्रेसवर मराठा समाजाशी दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
5. मराठा आंदोलनाचे पुढील पाऊल काय असू शकते?
जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.