Beed Politics News : अनेक वर्ष आधी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या पश्चात पंकजा मु्ंडे यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे यांनी नुकतीच त्यांची साथ सोडली. मुंबईत अजित पवारांची भेट घेत या पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पकंजा मुंडे यांच्या अनेक निवडणुकांमध्ये सक्रीय राहिलेल्या राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांच्या अचानक पक्ष सोडून जाण्याने पंकजा मुंडे यांना फटका बसणार का? अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या माध्यमातून राजाभाऊ-बाबरी मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने सहाजिकच जिल्ह्यात हे दोघे त्यांच्या नेतृत्वात काम करणार हे स्पष्ट आहे. धनंजय मुंडे-प्रकाश सोळंके यांच्यात सख्य नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या पिता-पुत्राच्या जोडीसोबत प्रकाश सोळंके जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हाती ठेवू पाहत आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
प्रकाश सोळंके यांची ही खेळी उलटवण्यासाठी धनंजय मुंडे काही प्रमाणात बहीण पंकजा मुंडे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा प्रभाव वडवणी आणि धारूर या दोनच तालुक्यात जाणवतो. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची साथ सोडल्यानंतर तो कितपत राहतो हा देखील प्रश्नच आहे? परंतु काही प्रमाणात का होईना या पिता-पुत्राच्या जोडीचा उपद्रव पकंजा मुंडे यांना सहन करावा लागेल, असे दिसते.
एकेकाळी दिवंगत गोपीनाथराव मुंडेंचे निकटवर्तीय असलेले राजाभाऊ मुंडेंकडेच मोठ्या सभांचे नियेाजन असायचे. पुढे पंकजा मुंडे यांचेही निकटवर्तीय अशी त्यांची ओळख कायम राहीली. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहीलेल्या राजाभाऊ मुंडे यांना बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी व बनावट संस्थांना कर्ज वाटप प्रकरणी दोन वर्षे जेलमध्ये काढावे लागले होते. त्यांचा वडवणी व धारुर तालुक्यात राजकीय प्रभाव आहे. मागच्या वेळी वडवणी नगरपंचायतीवरही त्यांचे वर्चस्व होते.
विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी माजलगाव मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवली. आता ते प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या धारुर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला डावलून सोळंके, आडसकर व मुंडे यांच्यामदतीने संचालक मंडळ बिनविरोध आणले. आता जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत या बाप-लेकाचा राष्ट्रवादीला किती फायदा होतो? आणि पंकजा मुंडे यांना नुकसान हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.