Manoj Jarange Patil News : सिंधुदुर्गजवळील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहचल्यावर तिथे भाजपचे खासदार नारायण राणे, निलेश राणे व त्यांच्या समर्थक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोट किल्ल्यावर जाणार असल्याचे सांगितले. ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये झालेला राडा योग्य नाही, जिथे हा प्रकार घडला ती जागा राजकारण करण्याची नाही, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना जेलमध्ये टाका. नाहीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. तर राजकोट किल्ल्यावर घटनास्थळी पाहणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. या प्रकारावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले मत व्यक्त करतांना घडलेली घटना संतपाजनक असल्याचे म्हटले आहे.
आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. (Maratha Reservation) छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना जेलमध्येच टाकले पाहिजे, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला. कायद्याचा धाक इतका पाहिजे की यापुढे कोणत्याच महापुरुषाचा अपमान करताना दहा वेळा विचार केला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहे. अशा दैवताचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे वेदनादायक आणइ संतापजनक आहे. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी केली पाहिजे. अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. पुतळ्याबाबत राजकारण करणे योग्य नाही, राजकारण करायला दुसरी भरपूर ठिकाण आहेत, असा टोला जरांगे पाटील यांनी ठाकरे- राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.