Chhatrapati Sambhajinagar News : आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नोंदी आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि ओबीसीमूधन मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. 8 जून रोजी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला एक महिन्याची मुदत देत स्थगित केले होते.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये याचे लेखी आश्वासन आणि कुणबी जातीची वाटप केलेली प्रमाणपत्र रद्द करा, अशी मागणी करत वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके, वाघमारे यांनी दहा दिवसांचे उपोषण केले. सरकारने या उपोषणाची दखल घेत ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, आव्हान देण्याची भाषा झाली. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत येत्या 13 जुलैला संपणार आहे. त्याआधी जरांगे पाटील यांनी पुढच्या लढाईचा अॅक्शन प्लॅन आखला आहे. त्यानुसार जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना अंतरवाली सराटी येथे ने येण्याचे आवाहन करत येत्या 6 जुलैपासून मीच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले.
हिंगोलीपासून सुरू होणारा हा दौरा 13 रोजी संभाजीनगरात थांबेल. त्यानंतर सरकार मराठा आरक्षणावर काय निर्णय घेते त्यावर जरांगे पाटील आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत, शेतीची कामे सुरू आहेत, ती सोडून अंतरवालीत येणे टाळा. उपोषणामुळे मलाही आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही अंतरवालीत माझ्याकडे येण्याऐवजी मी तुमच्याकडे येतो.
तुम्ही आहे त्या ठिकाणीच आंदोलन सुरू करा, मी 6 ते 13 जुलै दरम्यान, मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, असे सांगत अंतरवालीत येऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
मनोज जरांगे पाटील 6 जुलै रोजी हिंगोली, 7 परभणी, 8 नांदेड, 9 जुलै रोजी लातूर जिल्ह्याचा दौरा करतील. त्यानंतर 10 रोजी धाराशिव, 11 जुलै बीड, 12 ला जालना आणि 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटील येणार आहेत. या निमित्ताने मराठवाड्यात पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन उभारण्याचा जरांगे यांचा प्रयत्न आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.