Jarange Patil Rally : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शनिवारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मात्र, ट्राफिकमुळे आताही लाखो लोक धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच उभे आहेत. त्यांना सभेपर्यंत पोचताच आले नाही.
सभेसाठी दूरवरून आलेले समाजबांधवांचे घोळके इकडे गेवराईपासून ते तिकडेही जालना रस्ता आणि छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर दूरपर्यंत उभे आहेत. वाहनांची संख्याही तेवढीच आहे.
अंतरवाली सराटी येथे गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यांच्या उपोषणात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी लाठीमार आणि बंदुकीतून छऱ्यांचा मारा केल्यानंतर आंदोलन देशभर गाजले. त्यानंतर सरकारने नमते घेत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या. सुरुवातीला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे चार दिवसांची वेळ घ्या म्हणत होते. पण, अनेक चर्चेच्या फेऱ्यानंतर सरकारने त्यांना ३० दिवसांची वेळ मागितली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकत ४० दिवसांची वेळ दिली. आता ही मुदत २४ ऑक्टोबरला संपणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे ‘मराठ्यांची सभा’ बोलावत या सभेच्या निमंत्रणासाठी राज्यभर दौरे केले. त्यांच्या राज्यभरातील सभांना उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणच्या सभा पहाटे चार वाजता झाल्या तरी गर्दी कायमच होती. दरम्यान, शनिवारच्या सभेसाठी समाज बांधवांनी शुक्रवारपासूनच अंतरवाली सराटीकडे कूच केली.
शनिवारी पहाटेपासून राज्यभरातून समाज बांधव सभेकडे वाहनांनी येत होते. वाहनांवर मनोज जरांगे पाटलांचे ‘मराठा योद्धा’ असे स्टिकर, तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांचे भगवे झेंडे लावलेले होते. अंतरवाली सराटीत शेकडो एकर मैदानावर झालेल्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला. मात्र, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या समाज बांधवांच्या वाहनांचे ट्राफिक आणि वडीगोद्रीजवळून अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील गर्दी यामुळे लाखो समाज बांधवांना सभेपर्यंत पोहोचताच आले नाही. हजारो वाहने रस्त्यावर आणि लाखो समाज बांधवांची गर्दीही सभेपासून लांब होती. मोबाईलवरून लाइव्ह सभा पाहण्याशिवाय या मंडळींना कुठलाही पर्याय नव्हता. तरीही समाज बांधवांतील संयम आणि मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे स्पिरीट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.