

नवनाथ इधाटे
Phulambri Politics : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये भर रस्त्यात आपली कार जाळून खळबळ उडवून देणारे, 2024 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत लाखांवर मते मिळवणारे, आपल्या विविध अभिनव आंदोलनामुळे चर्चेत असलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना जालना-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
दोन वर्षासाठी या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतची नोटीस साबळे यांना पाठवण्यात आली आहे. गुंडगिरी, दहशत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून या नोटीसीवर पाच दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील सरपंच मंगेश संजय साबळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये?, याबाबत सहायक पोलीस आयुक्त, शहर विभाग सागर देशमुख यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी कारणे त्यांना दाखवा नोटीस बजावली आहे.
पोलिसांच्या नोटिशीनुसार, साबळे यांच्या कथित हालचाली व कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवितास, सुरक्षिततेस व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मारामारी, धमकी, गैरकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय कार्यालयात गोंधळ घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि शासकीय अधिकारी-कर्मचार्यांना वेठीस धरणे, अशा स्वरूपाचे आरोप पोलिसांनी नोटिशीत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या नोटिसीमध्ये काही गोपनीय साक्षीदारांचे जबाबही नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये साबळे हे गावचे सरपंच असून गेल्या काही वर्षांपासून गावातील व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, कंत्राटदार तसेच सरकारी कर्मचारी यांना धमकावून त्रास देत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
खोटे गुन्हे दाखल करण्याची किंवा समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोपही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये असल्याचे नोटिशीत नमूद आहे. मात्र, हे आरोप पोलिसांच्या नोटिशीत नमूद झालेले असून त्यांची न्यायालयीन पातळीवर सत्यता सिद्ध झालेली आहे, असे या कागदपत्रावरून म्हणता येत नाही.
एका गोपनीय साक्षीदाराने सुमारे महिनाभरापूर्वी गेवराई पायगा येथे साबळे व त्यांच्या काही साथीदारांनी आपल्याला बोलावून धमकावल्याचा आरोप केल्याचे नोटिशीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्यामुळे आपण तक्रार केली नसल्याचेही जबाबात नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुसऱ्या साक्षीदाराने गिरजा नदीच्या पुलाजवळ मोटारसायकल अडवून धमकावल्याचा आरोप केला आहे.
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटीचौक, क्रांतीचौक, जवाहरनगर आणि फुलंब्री पोलीस ठाण्यांमध्ये साबळे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये २०२० पासून २०२६ पर्यंतच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यात २०२६ मधील दोन गुन्हे, जवाहरनगर पोलीस ठाण्यात २०२० मधील गुन्हा, तर फुलंब्री पोलीस ठाण्यात २०२१, २०२३ आणि २०२४ मधील गुन्ह्यांची नोंद असल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
काही प्रकरणे तपासाधीन असून काही प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्याचेही तक्त्यात नमूद आहे. याशिवाय १५ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र नागरिक सुरक्षा संहितेतील कलम १२९ अन्वये प्रतिबंधक कारवाई करून बंधपत्र घेण्यात आल्याचाही उल्लेख आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या कारवायांनंतरही कथित वर्तणुकीत सुधारणा झालेली नसल्याने हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
कथित प्रकारांचाही उल्लेख
फुलंब्री तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित काही घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणे, आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेवर दबाव आणणे आदी आरोप संबंधित अभिकथनांमध्ये करण्यात आले आहेत. काही घटनांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याचेही कागदपत्रात नमूद आहे.
पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीच्या प्रकरणात कार्यालयात प्रवेश करून गोंधळ घातल्याचा, नोटांची बंडले दाखवत पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोपही एका गुन्ह्यात नमूद असल्याचे कागदपत्रातून दिसते. या प्रकरणात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आल्याचा उल्लेख आहे.
आंदोलनांच्या प्रकारांचाही पोलिसांकडून आधार
काही आंदोलनांदरम्यान शासकीय कार्यालयात जमावासह प्रवेश करणे, कार्यालयीन कामकाजात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोपांचाही उल्लेख आहे. एका घटनेत पाण्याच्या टाकीवर आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळा व जुने कपडे पाण्याच्या टाकीच्या गिलावर लावल्याचा तसेच पुतळा व जुने कपडे महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या पाइपवर टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
खुलासा करण्याची संधी
सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी बजावलेल्या नोटिशीनुसार, साबळे यांना आपले स्पष्टीकरण देण्यासाठी तसेच बचावाचे साक्षीदार तपासण्यासाठी वकिलामार्फत किंवा प्रतिनिधीमार्फत चौकशीस उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत चौकशीसाठी हजर राहून आपला खुलासा सादर करण्याचे निर्देश आहेत.
निर्धारित वेळेत हजर न राहिल्यास त्यांच्या गैरहजेरीत चौकशी सुरू ठेवून एकतर्फी अहवाल सादर केला जाऊ शकतो, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. नोटिशीच्या अखेरीस, संबंधित कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता, नागरिकांचे जीवन, मालमत्ता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा तसेच जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार का करू नये, असा सवाल करण्यात आला आहे.
माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र- साबळे
माझ्या समाजाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने वेळोवेळी प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात आवाज उठवला. त्याचबरोबर समाज हिताचे काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे काही राजकीय लोकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून हद्दपार करण्याचा मनसुबा आखला आहे. तशी नोटीस देखील मला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यातून हद्दपारची नोटीस मिळाल्याने आता आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा इशारा, मंगेश साबळे यांनी दिला आहे.