Latur Political News : मराठा आरक्षण मागणीसाठी तसेच जालना तेथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठा सेवा संघ व मराठा समाज बांधवांनी घेराव घातला. (MLA Sambhaji Patil Nilangekar) यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. आपण आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही निलंगेकर यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाने कोणत्याही राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील व त्यांच्यासोबतच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. (Latur) गावातील लोकांना घरात घुसून मारण्याचा प्रयत्न झाला, गोळ्या झाडल्या गेल्या.
शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही मराठा सेवा संघ व मराठा बांधवांच्या वतीने तीव्र निषेध केलेला आहे. (Sambhaji Patil Nilangekar) आजपर्यंत मराठा समाजाचे ५८ मूक मोर्चे शांततेच्या मार्गाने संपन्न झाले. साधा कचरा सुद्धा मराठ्यांनी रोडवर पडू दिला नाही, या मोर्चाची जगाने दखल घेतली.
पण काही विकृत मानसिकतेच्या पोलिसांनी मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी विनाकारण लाठीचार्ज केला आणि शेकडो लोक जखमी केले. त्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडावी, अशी मागणी करत मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निलंगेकर यांना घेराव घातला.
यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम. एम. जाधव, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, इंजि. मोहन घोरपडे, आर. के. नेलवाडे, डी. बी. बरमदे,नयन माने,अजित जाधव, महेश ढगे,सिद्धेश्वर माने, मारुती शिंदे, विशाल झरे, अमोल माने, अजित उसनाळे, रवी लोभे, संतोष तुगावे, अजित लोभे,वैजनाथ तळबुगे, शाहूराज सूर्यवंशी, अविनाश शिंदे, गणेश शिंदे,सचिन लोभे, शरद शिंदे, अमित माने,धीरज सोळुंके आदींची उपस्थिती होती.
निलंगेकर यांनी यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारून शासनावर दबाव निर्माण करावा, हीच आपल्या आंदोलनाची ओळख आहे. राजकीय स्वार्थासाठी काही मंडळींकडून आंदोलनाला गालबोट लावले जात आहे. समाज हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आरक्षणप्रश्नी आपण समाजाच्या सोबतच आहोत, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.