Maratha Reservation News : `अंतरवालीत एक सप्टेंबर रोजी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, तेव्हा मी वडीगोद्रीहून दुकान बंद करून घरी परत येत होतो. पोलिसांनी माझी दुचाकी अडवली, मी त्यांना काही सांगणार तोच एक गोळी माझ्या दिशेने आली आणि शरीरात घुसली. क्षणार्धात खाली कोसळलो आणि उपचारासाठी दाखल केले तेव्हा माझे डोळे उघडले. (Manoj Jarange News) एका गोळीतून निघालेले अकरा छर्रे माझ्या शरीरात घुसले. आधी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्झी आणि नंतर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात अकरापैकी नऊ छर्रे काढण्यात डाॅक्टरांना यश आले. अजूनही दोन छर्रे शरीरात घेऊन मी वावरतोय.
पण अकरा छर्रे शरीरात घुसले तेव्हा जितका त्रास मला झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी पट यातना आज मनोज जरांगे पाटलांची अवस्था पाहून होतोय. (Maratha Reservation) सरकारने त्यांचे उपोषण संपवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आणि सगळ्या मराठ्यांना दिवाळी साजरी करू द्यावी, अशा भावना मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले आकाश कवडे पाटील यांनी `सरकारनामा` शी बोलताना व्यक्त केल्या.
एक दिवस उशिरा जेवण मिळाले तर दणआपट करणारे आपण, मग जरांगे पाटील नऊ दिवसांपासून अन्न पाण्यावाचून कसे राहत असतील? त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था असेल? याचा एकदा विचार करा आणि हा तिढा सोडवा, असे आवाहन आकाश कवडे यांनी केले आहे. (Jalna) अंतरवाली सराटीत १ सप्टेंबर रोजी जे घडले त्याच्या कटू आठवणी आता काढाव्या वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यापासून आहे. (Marathwada) लाठीहल्ला आणि गोळीबाराची घटना घडली तेव्हा मी वडीगोद्रीवरून माझे दुकान बंद करून अंतरवालीत आलो होतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री सुरू होती, माझी गाडी पोलिसांनी अडवली. मी दुकान बंद करून गावात आत्ताच आलो हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात साधारणता शंभर फुटांवरून सुसाट आलेली गोळी मला लागली. एका गोळीतून अकरा छर्रे माझे शरीर भेदून आत घुसले. माझ्यासह अनेक आंदोलक, महिला तेव्हा गंभीर जखमी झाल्या होत्या. तो प्रसंग डोळ्यांसमोर आला की आजही अंगावर शहारे येतात. मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात येऊन माझी चौकशी केली, डोक्यावरून हात फिरवला तेव्हा त्यांच्या डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसत होती.
गेल्या महिन्यात मी मुंबईतून उपचार घेऊन अंतरवालीत परतलो. जरांगे पाटलांनी दुसऱ्या टप्प्याचे आंदोलन सुरू केले आणि बेमुदत उपोषणाचा त्यांचा आज नववा दिवस आहे. सरकारने पाठवलेले शिष्टमंडळ त्यातील न्यायमूर्ती जरांगे पाटलांना कायदा समजावून सांगत आहेत. गोरगरिबांचा लढा ते लढताहेत, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी सरकारला अंगावर घेणारा असा प्रामाणिक लढवय्या कार्यकर्ता पुन्हा होणार नाही. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे, सरकारने आता अधिक अंत न पाहता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची दिवाळी गोड करावी, एवढीच माझी इच्छा आहे. सरकारने काय निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा.
राहिला मराठा समाजाचा प्रश्न तर समाज जरांगे पाटलांच्या शब्दाबाहेर नाही. ते ठरवतील तेच आमच्यासाठी अंतिम असेल हे मात्र नक्की. जरांगे पाटलाच्या प्रकृतीच्या काळजीतून मला वैयक्तिक असे वाटते की यातून आता मार्ग निघालाच पाहिजे. सरकारनेही टोकाची भूमिका घेऊ नये, कायद्यावर टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी सरकारला खरंच आणखी काही वेळ देण्याची गरज आहे का?
जर जरांगे पाटलांनी तो दिला तर त्याचा सरकार प्रामाणिकपणे मराठ्यांना सरसकट टिकणारे आरक्षण देण्यासाठी त्याचा योग्य वापर करेल का? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. जरांगे पाटलांसारखा लढवय्या व्यक्ती अन्न-पाण्यावाचून निपजीत पडणे कुणालाही रुचणारे नाही. सरकार आणि स्वतः जरांगे पाटील यातून योग्य मार्ग काढतील, असा विश्वासही आकाश कवडे पाटील यांनी व्यक्त केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.