दिलीप दखणे
Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठवाड्यात फिरून जनजागृती रॅली काढत असताना आरक्षण बचावसाठी वडीगोद्रीत दहा दिवस उपोषणाला बसून सरकारकडून लेखी आश्वासन मिळवणारे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे रविवारी (ता. 7) रात्री अचानक अंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण बचावाच्या समर्थनात गावातून रॅली काढली.
गावकऱ्यांनी हाके, वाघमारे यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाजाला (Maratha Reservation) सगेसोयऱ्यांसह ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात हाके यांनी थेट अंतरवालीत येऊन उपोषणाची घोषणा केली होती. तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी हाके यांना अंतरवाली सराटी येथे उपोषणास परवानगी नाकारली होती.
त्यानंतर जवळच असलेल्या वडीगोद्रीत हाके, वाघमारे यांनी दहा दिवस उपोषण करत सरकारला जेरीस आणले होते. त्यानंतर काल लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी रात्री अंतरवाली सराटीत येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली रविवारी परभणीमध्ये होती. त्याचवेळी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी अंतरवालीत रॅली काढल्याने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला.
गावातील महिलांनी हाके, वाघमारे यांचे औक्षण करत त्यांचे स्वागत केले. दहा दिवस उपोषण केलेल्या वडीगोद्री येथे आल्यानंतर रात्री उशीरा ते अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. गावात ठिकठिकाणी त्यांनी भेटी देत लोकांशी संवाद साधला. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीकृष्ण मंदिरात जाऊन हाके यांनी दर्शन घेतले. त्यानंतर शेकडोंच्या उपस्थितीत हाके, वाघमारे यांनी गावातून फेरी काढली.
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचावसाठी केलेल्या आंदोलन व उपोषणात अंतरवाली सराटी येथील ओबीसी समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता. याबद्दल हाके, वाघमारे यांनी समाज बांधवाचे आभार मानले. यावेळी गावातील विद्यार्थी, तरुणांशी या दोघांनी संवाद साधला. आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील वातावरण तापले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, अशी भूमिका घेत राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे हाके, वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी दौरे सुरू केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात हाके यांच्या रॅलीवर दगडफेक झाल्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष भडकला होता.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तर 6 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीतून आपल्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. हिंगोली, परभणीनंतर सोमवारी जरांगे यांची रॅली नांदेडमध्ये सुरू आहे. अशावेळी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी थेट अंतरवाली सराटीत दाखल होऊन जनजागृती फेरी काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.