Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधरमध्ये सगळेच पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार!

Marathwada Graduate Constituency Election 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असला तरी भाजपने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Marathwada Graduate Constituency Election 2026
Marathwada Graduate Constituency Election 2026Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे.

  2. भाजप-शिवसेना युतीत जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.

  3. या निवडणुकीत कोणाचा फॉर्म्युला यशस्वी ठरेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Mahayuti-Mahavikas Aghadi News : पुढील वर्षी होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतील आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष स्वबळावर नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. यापुर्वी शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट लढत व्हायची. परंतु शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप या तीन पक्षांची महायुती आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडून आलेले आहेत. त्याआधी जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने भाजपकडून खेचून घेतला तो अद्याप त्यांच्याकडेच आहे. दोनवेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव सतीश चव्हाण यांनी केला होता. 2026 मध्ये होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असला तरी भाजपने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांची पदवीधर नोंदणी प्रमुख म्हणून पक्षाने निवड केली आहे. त्यांना परिषदेचा केवळ अकरा महिन्यांचा कार्यकाळ मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केनेकर यांना मराठवाडा पदवीधरच्या माध्यमातून पुन्हा परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या शिवाय भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, किरण पाटील, समीर राजूकर यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.

Marathwada Graduate Constituency Election 2026
Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधरमध्ये युती नाही; कामाला लागा, अशोक चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ तीनवेळा राष्ट्रवादीने जिंकला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत तो ताब्यात घेण्याचा चंग राज्यातील नेत्यांनी बांधला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतः यासाठी लक्ष घातले आहे. पदवीधरांची सर्वाधिक नोंदणी करत यावेळी मैदान मारण्यासाठी मराठवाड्यातील भाजपाचे पदाधिकारी नेते कामाला लागले आहेत. बैठका, दौरे करत मतदार नोंदणीवर अधिक भर दिला जात आहे.

सतीश चव्हाणच? की भाकरी फिरवणार..

मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड आहे. तीन टर्म नेतृत्व करणारे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी विधानसभेला गंगापूरमधून नशीब आजमावले. त्यासाठी पक्षांतरही केले, पण त्यांचा पदवीधरची निवडणुक जिंकण्याचा अनुभव विधानसभेला मात्र कामाला आला नाही. गंगापूरमध्ये अपयश आल्यानंतर सतीश चव्हाण पुन्हा स्वगृही परतले आणि आता पुन्हा त्यांच्याच नावाची पक्षात चर्चा आहे. पक्षातून स्पर्धा नसल्याने चव्हाण जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी यंत्रणा राबवण्याचा अनुभव, दांडगा संपर्क, शिक्षण संस्थांचे जाळे ही चव्हाण यांची बलस्थाने आहेत. शिवाय अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे अजित पवार त्यांना बदलण्याची जोखीम घेणार नाही, असे चित्र आहे. तूर्तास चव्हाण यांना पक्षात स्पर्धा नाही, पण ऐनवेळी भाकरी फिरवण्याचा निर्णय झाला तर नवे नाव समोर येऊ शकते.

घड्याळ विरुद्ध तुतारी?

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. मतदार नोंदणी प्रमुख पदाच्या जबाबदारी सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी पक्ष कामाला लागला आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर आपली लढण्याची इच्छा असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

पक्ष फुटल्यामुळे पदवीधर मतदारांचीही विभागणी झाली आहे. राजेश टोपे यांना विधानसभा लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव असला तरी त्यांच्यासाठी पदवीधरचा पेपर सोपा असणार नाही. आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? यावर मराठवाडा पदवीधरची लढत थेट होणार? की मग तिरंगी, चौरंगी हे ठरले.

दोन्ही शिवसेना तयारीत..

तिकडे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावर मतदार नोंदणी करून घेण्याची जबाबदारी दिली आहे. महायुतीत बिनसले तर ते उमेदवार ठरू शकतील. त्यांनाही पक्षातून फारशी स्पर्धा नाही. स्पर्धा नसली तरी मराठवाड्यात मतदार नोंदणी करण्यात हा पक्ष किती यशस्वी ठरतो यावरून त्यांची उपद्रव शक्ती दिसणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यापुर्वी पदवीधरची निवडणूक लढलेले राजू वैद्य यांना पुन्हा मैदानात उतरवले जाऊ शकते. त्यांना ही निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर वगळता इतर सहा जिल्ह्यात पक्षाची ताकद अजूनही कायम आहे. याचा निश्चित फायदा त्यांना होऊ शकतो. याशिवाय एमआयएम व इतर पक्षांची नेमकी या निवडणुकीत काय भूमिका असले? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

FAQs

1. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक कधी होणार आहे?
→ राज्य निवडणूक आयोगाकडून २०२६ अखेरीस या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

2. या निवडणुकीत कोणकोणते पक्ष स्पर्धेत आहेत?
→ भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्वतंत्र उमेदवार हे प्रमुख स्पर्धक असतील.

3. महायुती आणि महाविकास आघाडीत तणाव का वाढला आहे?
→ उमेदवार निवड आणि जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये तणाव आहे.

4. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात किती मतदार आहेत?
→ साधारणतः 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत.

5. या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होऊ शकतो?
→ निकालानुसार दोन्ही आघाड्यांची एकता वा तुटणं ठरू शकतं, ज्याचा थेट परिणाम आगामी विधानपरिषद निवडणुकांवर होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com