Chhatrapati Sambhajinagar News : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार सत्तेवर आले. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ काही तासांनी घेणार आहे. पण मोदींच्या याआधीच्या सरकारमध्ये मराठवाड्यातून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले संभाजीनगरचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे मात्र आता असणार नाहीत.
मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातून कराड यांना वगळल्याची चर्चा आहे. तर रावसाहेब दानवे यांचा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून पराभव झाल्यामुळे तेही आता या नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे मोदींच्या तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारमधील मंत्रीमंडळातून मराठवाडा आऊट झाल्याची चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात भाजप महायुतीला मोठा फटका बसला. विशेषतः मराठवाड्यातील आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीला जिंकता आली.
यामुळे मराठवाड्यातून संदीपान भुमरे यांना मोदींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून तरी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भुमरे यांच्या ऐवजी अनुभवी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव शिंदे गटाकडून पुढे करण्यात आले. मराठवाड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (dr.Bhagwat Karad) यांच्याकडे परभणी, हिंगोलीसह काही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रभारी म्हणून सोपवण्यात आली होती. मात्र या मतदारसंघात भाजप महायुतीला यश मिळाले नाही.
परिणामी मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातून त्यांना डिच्चू देण्यात आल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातून निवडून आलेल्या एकमेव शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्या नावाचाही विचार झालेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने केंद्राच्या मंत्रीमंडळात मराठवाड्याची पाटी यावेळी कोरी राहणार असे दिसते.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.