(औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली असतांनाच नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र जिल्हाधिकाऱ्यांना `तुम दारू पिते क्या`?, असे विचारत असतांनाचा त्यांच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ते बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद यांना हे विचारत असतांना स्पष्ट दिसत आहे. पण चूक मान्य करतील ते सत्तार कसले?
उलट मी असे बोललोच नाही, मी त्यांना चहा पिता का? असे विचारले म्हणत आता आम्ही मजाक पण करायची नाही का? असा सवाल केला आहे. (Marathwada) मुळात कृषीमंत्र्यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. त्यावेळी (Abdul Sattar) सत्तारांना मजाक कशी सुचते हा खरा प्रश्न आहे. बरं जिल्हाधिकाऱ्यांनी चहा घेण्यास नकार दिल्यामुळे मुद्दाम सत्तार यांनी त्यांना तुम दारू पिते क्या? म्हणत त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केल्याचे दिसते.
एकंदरित अब्दुल सत्तार यांना सत्तेची नशा चढली आहे असेच म्हणावे लागेल. सत्तार यांच्या एकूणच आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीवर नजर टाकली तर वाद आणि सत्तार यांचे जुनेच समीकरण असल्याचे समोर येते. सातत्याने पक्ष बदलत, सत्ता मिळत गेल्यामुळे कदाचित सत्तार यांच्या डोक्यात हवा गेली असावी. पण मतदार हा राजा असतो आणि तो भल्याभल्यांच्या डोक्यात गेलेली सत्तेची हवा उतरवतो हा इतिहास आहे.
आदित्य ठाकरे यांना छोटा पप्पू म्हणून हिणवणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा `अंब्या`, असा जाहीरपणे उल्लेख करणे हे काही परिपक्व राजकारण्याचे लक्षण निश्चितच नाही. टीका करतांना देखील मर्यादा, पातळी सांभाळली गेली पाहिजे. राज्यात व देशात अशी अनेक उदाहरणे आहेत जी नेते मंडळी देश आणि जगाच्या पातळीवर काम करतात, पण त्यांनी कधीही आपल्या तोंडून विरोधकांबद्दल देखील वाईट शब्द काढलेले नाहीत. पण कृषीमंत्री सत्तारांच्या यादीत बहुदा या नेत्यांची नावे नसावीत.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, सततचा आणि परतीचा पाऊस अशा एकापोठोपाठ आलेल्या संकटांनी शेतकरी खचला आहे. अशावेळी त्याला दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्री व त्यांचे सरकार मात्र राजकीय दौरे आणि भाषणबाजीतच मश्गुल असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची परस्पर घोषणा करणे, मुख्यमंत्र्यांच्याच सचिवाला शिवीगाळ करणे हे सत्तारांच्या बाबतीतले काही ताजे वाद एकूणच त्यांची कार्यपद्धती दर्शवण्यास पुरेसे आहे.
भाजपने शिंदे गटातील मंत्री, आमदारांना आवर घालण्याच्या सूचना मुख्यंत्र्यांना वेळोवेळी दिल्या असल्या तरी शिंदेंनी देखील याकडे कानाडोळा केला की काय? अशी शंका येते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी जवळ केलेल्या शिंदे गटाला कसे तरी अडीच वर्ष सहन करायचे? अशीच भूमिका भाजप आणि त्यांच्या नेत्यांची दिसते. शासकीय अधिकाऱ्यांना डांबवून ठेवणे, त्यांना कानाखाली आवाज काढण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना यापुर्वी समज दिली गेली आहे.
तर परस्पर धोरणात्मक निर्णयांची घोषणा करू नका, अशा कानपिचक्या सत्तारांना देखील देवून झाल्या आहेत. आता शासकीय अधिकाऱ्यांबद्दल भलतंसलतं काही बोलू किंवा विचारू नका, असे देखील सत्तारांना सांगण्याची गरज वाटू लागली आहे.
काही दिवसांपुर्वी जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबद्दल एक विधान केले होते. सत्तार यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची आणि सरकार धोक्यात येईल, अशी भविष्यावाणी गोरंट्याल यांनी केली होती. सत्तार यांची वाटचाल त्या दिशेने जाणारी तर ठरत नाहीयेना? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.