Marathwada Water Crisis News : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी दिसली एकजूट, टोपेंनी वेधले लक्ष...

Maharashtra News : मराठवाड्याच्या प्रश्नावर अशीच एकजूट कायम राहिली, तर भविष्यात बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल.
Marathwada Water Issue News
Marathwada Water Issue NewsSarkarnama

MLA Rajesh Tope News : उर्ध्व भागातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे 8.5 टीएमसी पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्ष, नेत्यांची एकजूट दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या दबावात असलेल्या सरकारला मराठवाड्याच्या एकजुटीपुढे अखेर झुकावे लागले. (Marathwada Water Crisis) न्यायालयीन लढा, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचा विरोध मोडून काढताना बराच संघर्ष करावा लागला.

Marathwada Water Issue News
Marathwada Water Crisis : जायकवाडीवरून नगरच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या आमदार बंब यांना विखेंच्या कानपिचक्या!

रास्ता रोको, निदर्शने, आंदोलनाने वातावरण तापले. उच्च न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती न देणे, सर्वोच्च न्यायालयाने तोच निर्णय कायम ठेवणे या सर्व गोष्टी (Marathwada) मराठवाड्याच्या पथ्थ्यावर पडल्या. जायकवाडीत पाणी रोखण्यासाठी कुठलाच मार्ग शिल्लक राहिला नाही, हे लक्षात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोधही कमी झाला. परिणामी काल रात्री 11 वाजता जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले.

या सगळ्या लढ्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) केंद्रस्थानी राहिले. राजेश टोपे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या 8.5 टीएमसी पाण्याचा मुद्दा उपस्थितीत केला. सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याला यशही आले. विशेष म्हणजे सत्ताधारी (Shivsena) शिवसेना (शिंदे गट) या आंदोलनात सहभागी झाल्याने या लढ्याला बळ मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवली. महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या लढ्याची दखल राज्य पातळीवर घेतली गेली. राजेश टोपे यांनी जायकवाडीतील पाण्यासाठी आंदोलनात दाखवलेला आक्रमकपणा, त्यांच्यासह 50 हून अधिक आंदोलकांची धरपकड, दाखल झालेले गुन्हे यामुळे प्रशासनाला अन् सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले.

भाजपने या आंदोलनात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, निर्णय झाला आहे; मग आंदोलन कशाला? असे म्हणत आपल्याच पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विरोध कसा करायचा ? या विवंचनेत मराठवाड्यातील नेते दिसले. राजेश टोपे यांनी या आंदोलनाची सूत्रं आपल्या हाती घेत पाणी सोडले नाही, तर प्रसंगी मराठवाडा बंद करू, असा इशारा देत आरपारची भाषा केली.

सरकार आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची ढाल पुढे करत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयोग त्यांच्याच अंगलट आला. मराठा आंदोलकांनी याचा जाब विचारताच माफी मागत पाटबंधारे खात्याने तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. दरवेळी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावापुढे झुकणाऱ्या सरकारला मात्र या वेळी मराठवाड्याने झुकवल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

मराठवाड्याच्या प्रश्नावर अशीच एकजूट कायम राहिली तर भविष्यात बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल. दरम्यान, जायकवाडी धरणामध्ये उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडणेबाबत मराठवाड्याच्या पाण्याच्या हक्काच्या लढ्यात पक्षविरहीत सर्व लोकप्रतिनिधी माजी आमदार, पाणी वापर सहकारी संस्था, मसिहा, पाणी परिषद, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्वांचे राजेश टोपे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com