Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणूकीसाठी सोमवारपासून (ता.२७) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या निवडणूकीची (Market Committee) अनेकांना प्रतिक्षा होती. अर्ज विक्री झालेल्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील फुलंब्री वगळता सहा बाजार समितीत अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी २४९ अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, लासूर स्टेशन, वैजापूर,कन्नड, (Kannad) फुलंब्री, पैठण, (Paithan) गंगापूर या बाजार समितीसाठी अनुक्रमे २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज पहिल्याच दिवशी सकाळी दहा वाजेपासून फुलंब्री वगळत सर्वच बाजार समितीच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सोसायट्या, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी या मतदारसंघासाठी अर्ज विक्री झाली.
यासह पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांनी अर्ज खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पहिल्या दिवसी राजकीय पक्षांऐवजी सर्वसामान्य इच्छुकांनीच अर्ज नेले. मात्र कोण अर्ज घेऊन जात आहे, यावर भाजपकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे बोलले जाते. दोन एप्रिल रोजी महाविकास आघाडीची शहरात संयुक्त जाहिर सभा होणार आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी कोणीही अर्ज खरेदीसाठी फिरकले नाही.
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावल्यानंतर भाजपने आता पुन्हा ती आपल्याकडे राखण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अद्याप मतदानच झाले नाही, तर सभापती पदाची चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीसाठी इच्छुकांनी ४८ उमेदवारी अर्ज घेतले. पैकी सात शेतकऱ्यांचा समावेश आहे. गंगापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६५, वैजापूर बाजार समिती ५२, कन्नड बाजार समिती ४९, लासूर स्टेशन बाजार समिती २३, तर पैठणसाठी १२ अर्जांची विक्री झाली.
महाविकास आघाडीतील पक्ष सभेच्या तयारीत अडकले आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट सभापती कोण होणार, पॅनलमध्ये उमेदवार कोण राहणार? याची चाचपणी करत आहेत. आपले नाव भाजप-शिंदे गटाच्या पॅनलमध्ये असावे यासाठी अनेकांची धडपड सुरु असून दुसरीकडे व्यापारी मतदारसंघातून इच्छुकांतर्फे बाजार समितीची एनओसी मिळण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अर्ज विक्रीचा वेळ संपल्यानंतर अनेकजण आले होते. ३ एप्रिल पर्यंत अर्ज विक्री होणार असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज विक्री होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.