Chhatrapati Sambhajinagar : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज व रश्मी यांचा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटामाटात पार पडला. दानवे यांनी विवाह सोहळ्याला सर्वपक्षीय नेते,मंत्री,आमदार- खासदार व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित येण्याचा योग होता.दानवेंच्या मुलाच्या लग्नाला दोन्हीही शिवसेना आणि भाजपचे नेते एकत्रित येतील अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु आगामी लोकसभा निवडणुका पाहता हे चित्र योग्य ठरणार नाही, याची जाणीव आणि सुरू असलेला राजकीय संघर्ष पाहता या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या खुबीने एकत्र येण्याचा योग टाळला.
अंबादास दानवे यांच्या मुलाचे लग्न म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या घरचाच कार्यक्रम, त्यामुळे वधू-वरांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यासाठी आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लग्नघटीकेच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाची सगळे नेते आवर्जून उपस्थित होते. सहा वाजून 30 मिनिटांनी विवाह सोहळा पार पडला. त्या आधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आमदार भास्कर जाधव, सुनील प्रभू यासह शिवसेनेचे बहुतांशी नेते विवाह स्थळी हजर झाले होते.
त्यानंतर अवघ्या काही मिनिटात वधूवरास शुभाशीर्वाद देत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटांची सगळे नेते तिथून बाहेर पडले. दरम्यान या सोहळ्यात अचानक आलेल्या पावसाचाही अडथळा आला. हा विवाह सोहळा बीड बायपास रोडवरील डिवाइन सिटीच्या मोकळ्या जागेवर असल्यामुळे पावसाने दानवे यांच्या उत्कृष्ट नियोजनावर पाणी फिरले. तब्बल 25 ते 30 हजार पाहुण्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे विवाह सोहळ्याला काही हजार लोकांचीच उपस्थिती राहिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मात्र विवाह सोहळ्याला हजेरी लावत अंबादास दानवे यांच्याशी यांच्याशी असलेले संबंध जोपासले. ठाकरे सेनेचे नेते समारंभ स्थळावरून निघून गेल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून दानवे परिवाराला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढला, या पावसातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विवाहस्थळी आले. त्यांच्यासोबत भागवत कराड, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, हरिभाऊ बागडे व जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते.
अवघ्या काही मिनिटात शुभेच्छा देण्याची औपचारिकता पार पाडत फडणवीस व भाजपचे नेतेही तिथून निघून गेले. साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे मंत्री आमदार विवाहस्थळी दाखल झाले. अंबादास दानवे यांनी या सगळ्यांचे स्वागत केले.शिंदे यांनी नववधूवरास पुष्पगुच्छ देत शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. अगदी काही मिनिटे थांबून मुख्यमंत्रीही पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
अंबादास दानवे हे उत्कृष्ट नियोजनासाठी ओळखले जातात. मुलाच्या विवाह सोहळ्याचेही त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. परंतु पावसामुळे या नियोजनावर पाणी फिरले गेले. परंतु या विवाह सोहळ्याला राज्यातील प्रमुख पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे दानवे यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि दबदबा या निमित्ताने दिसून आला.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.