

Beed politics News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरुपानंद विश्वनाथ देशमुख यांनी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.
गेल्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा संतोष देशमुख यांनी नऊ मतांनी पराभव केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील न्यायालयीन लढ्यात आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत, पण न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत देशमुख कुटुंबानेही राजकारणापासून दूर राहावे, असा सल्लाही स्वरुपानंद यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.
गावकऱ्यांना निवडणूक बिनविरोध करायची असेल तर प्रत्येक घटकाशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. मोजक्या लोकांशी किंवा ज्यांचा गावाशी संबंध नाही, अशा बाहेरच्या लोकांनी सांगितले म्हणून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. जर बिनविरोध निवड करायचीच असेल तर गेल्यावेळी संतोष भैय्या यांच्याविरोधात मी फक्त नऊ मतांनी पडलो होतो, आता गावकऱ्यांनी मला संधी द्यावी, असे आवाहनही स्वरुपानंद देशमुख यांनी केले आहे.
उद्या, 9 एप्रिल रोजी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, तो कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, मस्साजोग सरपंच पदाची निवड बिनविरोध होणार नाही, असा ठाम दावाही स्वरुपानंद यांनी केला आहे. एकीकडे धनंजय देशमुख यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत आपण उमदेवार राहणार नाही, आमच्या वहिनींना सरपंच पदाचा आणि बाजार समिती सभापती पदाचा अनुभव आहे, असे म्हटले होते.
ग्रामस्थांनी देखील त्यांना बिनविरोध सरपंच करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बैठक झाली असून दोन-तीन दिवसात गावातील मंडळी याचा निर्णय जाहीर करतील. मी संतोष देशमुख यांच्या न्यायालयीन लढ्यात पूर्णपणे लक्ष देणार आहे. त्याकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी आपण उमेदवारीसाठी दावा सांगणार नसल्याचे धनंजय देशमुख यांनी कालच स्पष्ट केले होते.
असे असताना आता गावातील स्वरुपानंद देशमुख यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला असून, उद्या ते आपला अर्ज दाखल करणार आहेत. कुठल्याच परिस्थितीत आपण माघार घेणार नाही, निवडणूक बिनविरोध करायची असेल तर गावकऱ्यांनी मलाच संधी द्यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण गावाने त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिला, आताही तो आहे, यापुढेही राहील. पण न्यायालयीन लढ्यासाठी तो पाठिंबा असेल, पण राजकीय भूमिका आमची वेगळी आहे. संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत देशमुख कुटुंबाने राजकारणापासून दूर राहावे, असे माझे मत आहे. अर्थात लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मग आमची राजकीय भूमिकाही वेगळीच असेल, असे स्वरुपानंद देशमुख यांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंचाचे निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त 88 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. आजपासून उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 13 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.