

Chhatrapati Sambhaji Nagar municipal corporation : महापालिका निवडणुकीत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तब्बल 22 माजी नगरसेवकांचा पत्ता कट केला. यावरून मागील आठवड्याभरापासून छत्रपती संभाजीनगरच्या एमआयएममध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी धुमसत होती. अखेर बुधवारी दुपारी या नाराजीचा स्फोट झाला अन् नाराज कार्यकर्त्यांनी थेट जलील यांच्यावरच हल्ला चढवला. या सगळ्यानंतर एमआयएमच्या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द पक्षाचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी महापालिका निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत छत्रपती संभाजीनगरात तळ ठोकून असणार आहेत. त्यांच्या सोबतीला बिहार आणि हैदराबाद येथील आमदारांची फौजही असणार आहे.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा दावा करत तब्बल 22 माजी नगरसेवकांचा पत्ता कट केला आहे. यावरून पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी असून अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. काहींनी काँग्रेसचा रस्ता धरला तर काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तिकीट वाटपावरून असलेली ही नाराजी आणि त्याचा पक्षाला बसणारा संभाव्य फटका लक्षात घेता ओवैसी यांनीच डॅमेज कंट्रोलची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे समजते. ओवैसी यांचा दौरा केवळ प्रचारापुरता नसून बंदिस्त बैठका, स्थानिक नेत्यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या महापालिका निवडणुकीत 26 नगरसेवकांसह एमआयएम शहरात दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आजघडीला एमआयएमचे 48 उमेदवार रिंगणात आहेत. पण तिकीट वाटप, प्रभागनिहाय उमेदवारी आणि स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष या कारणांमुळे पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार नाराज आहेत. या नाराजीतून शहरात इम्तियाज जलील यांच्या विरोधात एक नाराज गट तयार झाला आहे. यामुळे एमआयएमचा पारंपरिक मतदार विभागला जाण्याची भीती याच पक्षाला 10 ते 12 जागांवर थेट फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधकांना आयती संधी :
एमआयएम पक्षाचे मुस्लिम बहुल भागातील बहुतांश प्रभागांवर वर्चस्व आहे. मात्र यातील काही प्रभागात इतर स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करत इतर प्रभागातील व्यक्तींनी उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे एमआयएम पक्षातील नाराज आणि असंतोषाचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच वंचित बहुजन आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी नाराज एमआयएमचे माजी पदाधिकारी पक्षाच्या प्रचाराला न जाता विरोधात काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विरोधकांना आयती संधी मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.