Aimim News : काळे झेंडे, धक्काबुक्की आणि आता थेट गाडीवर हल्ला झाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. पोलीसांनी या गुंडांना रोखावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली तर ठीक नाहीतर आम्हीही वाकड्यात शिरू, असा निर्वाणीचा इशारा इम्तियाज यांनी हल्ल्याच्या घटनेनंतर दिला. हल्ले करणारे हे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे गुंड आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या लोकांना त्यांच्याकडून पैसे घेऊन काम केले होते, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला आहे.
एमआयएमने महापालिका निवडणुकीसाठी पन्नास उमेदवार दिले होते. जुन्या बहुतांश नगरसेवकांची उमेदवारी कापत इम्तियाज जलील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. परंतु त्यांच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष असल्याचे दिसून आले आहे. एमआयएमच्या प्रचार फेऱ्यांमध्ये इम्तियाज यांना ठिकठिकाणी विरोध, काळे झेंडे दाखवले जात आहे. तर काही भागात धक्काबुकी करत त्यांना प्रचारासाठी येण्यास विरोध करण्यात आला. जिन्सी भागात तर इम्तियाज जलील यांच्या गाडीवर थेट हल्लाच करण्यात आला. यात त्यांचे काही समर्थक जखमीही झाले आहेत.
या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी ज्यांनी हल्ला केला ते कधीच एमआयएम पक्षाचे नव्हते आणि आजही नाहीत असे म्हटले आहे. हल्लेखोर हे भाजपचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे किरायाचे ट्ट्टू आहेत. त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी हा हल्ला केला असला तरी आम्ही थांबणार नाही. मी हे सगळं आता पोलीसांवर सोडलं आहे. या गुंडाचा कसा बंदोबस्त करायचा ही पोलीसांची जबाबदारी आहे. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा कोणाला विरोध केला जाणार नाही.
पण आमच्यावर हल्ले करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलीस कसा करतात? त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई होते की नाही? यावर हे सगळे अवलंबून असेल. आम्ही कोणाच्या वाकड्यात शिरणार नाही, पण पोलीसांनीही बघ्याची भूमिका घेतली तर मात्र आम्हाला वाकड्यात शिरावे लागेल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. दरम्यान, प्रचार रॅली संपवल्यानंतर इम्तियाज जलील हे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहेत. प्रचाराला आम्ही येऊच नये, असा विरोधकांचा प्रयत्न, त्यातून होणारे हल्ले हे गंभीर आहेत. असे करणाऱ्यांवर पोलीसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आपण पोलीसांकडे करणार आहोत, असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले.
विशेष म्हणजे आजच पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. आमखास मैदानावर सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील व एमआयएमचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. पुढील सहा-ते सात दिवस ओवेसी हे प्रचारासाठी शहरातच तळ ठोकून असणार आहेत. एमआयएमच्या नाराज नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ओवेसी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु त्यांना अद्याप वेळ देण्यात आलेली नाही. सभेत काही गोंधळ होऊ नये, याची खबरदारी आता पोलीसांना घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.