AIMIM News : राज्यातील महायुती सरकारला सत्तेवर येऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसातील कामगिरीचे राज्य सरकारने आपले प्रगती पुस्तक सादर केले. यामध्ये 48 विभागांची कामगिरी दर्शवणारा तक्ता प्रसिद्ध केला आहे. यावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक बाबींच्या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्यांक मंत्रालय समाविष्ट नाही, याकडे इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधले. गंभीर बाब आहे, मुख्यमंत्री महोदय 'हम भी खडे है राहो मे, जरा नजरे इनायत इधर भी की जिए कभी' अशा शायराना अंदाजात इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक बहुमताच्या जोरावर पारित करून घेतले. यावरून देशभरातील मुस्लिमांमध्ये नाराजीचा सूर असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेषत: एमआयएमने या मुद्द्यावरून देशभरात रान पेटवण्याचा प्रयत्न केला. असदोद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुस्लिमांच्या जमिनी हडपणारा हा कायदा असल्याची टीका केली होती.
तसेच वक्फ बोर्डावर हिंदू व्यक्ती नियुक्त करणारा असाल तर देशातील तिरुपती बालाजी, शिर्डीच्या साई संस्थांनवर माझी निवड करणार का? असा सवाल करत वक्फ बोर्डामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये. गोरगरिबांच्या जमिनी लाटून त्या आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप एमआयएमने केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला जात आहे.
या संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या 48 विभागांच्या विविध मुद्द्यांवर सरकारने नेमकी काय कार्यवाही केली आणि त्याची टक्केवारी किती? आहे हे दर्शवणारा तक्ता प्रसिद्ध केला आहे. याशिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांची संख्याही दर्शवली आहे. मात्र या 48 विभागांमध्ये अल्पसंख्यांक मंत्रालयाचे नाव नसल्याचे इम्तियाज जलील यांनी हेरले आणि आपल्या 'एक्स' या सोशल मिडिया हॅंडलवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री महोदय, आपल्या सरकारच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम आणि त्याची प्रगती आपण सांगत आहात. मात्र यामध्ये अल्पसंख्यांक मंत्रालयाचा समावेश नाही, ही गंभीर बाब आहे. 'देवेंद्र फडणवीस हम भी खडे है राहो मे जरा नजरे इनायत इधर भी की जिए कभी' असे म्हणत इम्तियाज जलील यांनी महायुती सरकारच्या काळात अल्पसंख्यांक मंत्रालय आणि लोकांवर अन्याय होत असल्याची टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.