Aimim News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ठाकरे गटाला तुमचे या कृतीला समर्थन आहे का? अशी विचारणा करत घेरलं आहे. (Imtiaz Jalil On Prakash Ambedkar) तर दुसरीकडे औरंगजेब वादावर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या मुस्लिम नेते, आमदार, खासदारांसह अन्य लोकप्रतिनिधींनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे कुणीही समर्थन करणार नाही, असाच सूर सगळे मुस्लिम नेते काढत आहेत. असे असतांना एमआयएमने मात्र वेगळाच सूर लावला आहे. खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Imtiaz Jalil) इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट म्हणजे धाडसी पाऊल असल्याचे म्हटले आहे. असे धाडस इतरांनी देखील करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.
सध्या राज्यात एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये फारसे राजकीय संबंध राहिलेले नाहीत. तरीही आपण वंचित बहुजन आघाडी व (Aimim) एमआयएम युतीचे खासदार आहोत याची जाणीव ठेवत इम्तियाज यांनी प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देण्याचे समर्थन केले आहे. ते करत असतांना इम्तियाज इतिहासातील दाखले देतात, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांची शिकवण काय होती? याचीही आठवण टीकाकारांना करून देतात.
औरंगजेबाच्या पोस्टर झळकावण्यावरून सर्वप्रथम वाद झाला तो इम्तियाज जलील खासदार आहेत त्याच शहरातून. तेव्हा देखील त्यांनी या घटनेला आपले समर्थन नसल्याचे जाहीर करत पोस्टर झळकावणाऱ्यांना हुसकावून लावले होते. औरंगजेब हा इतिहास होता आणि तो पुसता येणार नाही, अशी भूमिका जरी इम्तियाज यांनी वेळोवेळी घेतली, तरी त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे समर्थन केले नाही. प्रकाश आंबेडकरांनी काल माध्यमांशी बोलतांना देखील इतिहासाचा संदर्भ देत विरोधकांना सुनावले होते.
औरंगजेब प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांचे सूर काहीसे जुळतांना दिसत आहेत. २०१९ च्या लोकसभेपुर्वी राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने वादळ निर्माण केले होते. दलित, मुस्लिम मतांची ही मोट बांधली गेल्याने राज्यातील प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले होते. पण प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव आणि एमआयएमच्या एकमेव इम्तियाज जलील यांचा झालेला विजय यातून युतीत मिठाचा खडा पडला.
वंचितने मुस्लिमांची मते आम्हाला मिळाली नाहीत, पण आमच्या मतदावर एमआयएमचा खासदार निवडून आला, असा आरोप केला. पुढे विधानसभेत वंचित-एमआयएमचे फाटले. प्रदेशाध्यक्ष असूनही युतीची चर्चा आपण इम्तियाज जलील यांच्याशी करणार नाही, अशी भूमिका तेव्हा आंबेडकरांनी घेतली होती. त्यानंतर इम्तियाज यांनी देखील आंबेडकर हे आरएसएसची भाषा बोलत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता.ओवेसी यांनी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले होते. याचा फटका विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना बसला. आता दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.
वंचितने प्रायोगिक तत्वावर हिंदुत्ववादी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली आहे. तर एमआयएमला अजूनही नवा जोडीदार मिळालेला नाही. वंचित सोबतच्या आघाडीबद्दल एमआयएमने कायम आपण आशावादी असल्याचे म्हटले होते? इम्तियाज जलील यांनी देखील या विषयावर आम्ही पुन्हा वंचितसोबत काम करण्यास इच्छूक असल्याचे मत व्यक्त केले होते. औरंगजेब कबरीला भेट दिल्याच्या निमित्ताने इम्तियाज यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांच्या या कृतीचे स्वागत केले. त्यामुळे वंचितसोबतच्या युतीसाठी एमआयएम अजूनही आशवादी असल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.