
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यात महायुतीतील आमदारांचीही भर पडली आहे. मुंडे यांचे देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे.
त्यातच आपच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने मुंडेंचे पिस्तुलधारी व्यक्तींसोबतचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले जात आहे.यावरुन राजकारण पेटलं असतानाच आता ओबीसी समाजाच्या नेत्यानंही सूचक विधान केलं आहे.
सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी सोमवारी नांदेडमध्ये मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरण आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले,धनंजय मुंडे यांच्याबाबत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही भूमिका राहील,तसेच त्यांच्याबाबत अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जी काही भूमिका घेतील ती आम्हांला मान्य राहील असं पाटील यांनी म्हटलं आहे.त्यांच्या या विधानानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
याचवेळी ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यावरुन मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. तायवाडे यांनी ओबीसी म्हणून धनंजय मुंडे यांना टार्गेट करु नये, अन्यथा आम्ही आंदोलन करु, असं म्हटलं आहे.
बबनराव तायवाडे म्हणाले,दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी, पण आतापर्यंतच्या चौकशीत त्यांचं नाव कुठे आलं नाही, मग त्यांच्यावर रोष का?, असा विचारणा विरोधकांना केली आहे.तसेच दोषी नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं आणि जीवनातून उठवण्याचं काम सुरु असून ते होऊ नये, अशी भूमिका घेत मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
याचवेळी त्यांनी बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण निंदनीय असल्याची संतप्त भावनाही व्यक्त केली.तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे. पण यात ओबीसी मराठा वाद निर्माण होऊ नये.मराठा आणि ओबीसी दरी निर्माण झाली होती, ती संपली होती.ती पोकळी पुन्हा निर्माण होऊ नये. बीड प्रकरणावरून ओबीसी नेते किंवा समाजाला टार्गेट करु नये,अशी प्रतिक्रिया ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
21 दिवस उलटूनही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधाराला पकडण्यात अपयश आल्यानं महायुती सरकारसह पोलिस प्रशासनावरचा दबाव वाढत चालला आहे. विरोधकांनी जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही,तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात यावं,अशी मागणीही उचलून धरली आहे.त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.