
Chhatrapati Sambhajinagar News : भाजपने आज राज्यभरातील शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्ष जाहीर केले, मात्र त्यात छत्रपती संभाजीनगरच्या शहराध्यक्षाचे नाव नाही. मंत्री अतुल सावे यांनी निवडीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचे घोडे अजूनही अडले आहे. आता हा विषय थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून अधिक मते मिळालेला उमेदवार शहराध्यक्ष होतो की सावे यांचा हट्ट पुरवला जातो याची उत्सुकता लागली आहे.
भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी राज्यातील 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील 8 अध्यक्षांची नावे जाहीर केली. त्यात नांदेड महानगरप्रमुखपदी अमर राजूरकर, परभणीत शिवाजी भरोसे, हिंगोलीत गजानन घुगे, जालन्यासाठी भास्करराव दानवे, जालना ग्रामीणसाठी आमदार नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर (उत्तर)साठी सुहास शिरसाट, छत्रपती संभाजीनगरसाठी (पश्चिम) संजय खंबायते तर धाराशीव येथे दत्ता कुलकर्णी यांची नावे या यादीत जाहीर करण्यात आली. मात्र त्यात छत्रपती संभाजीनगरच्या शहराध्यक्षाचे नाव नाही.
शहराध्यक्ष पदावरून भाजपमध्ये संघर्षाचा भडका उडाला असून मंत्री अतुल सावे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. त्यांनी विद्यमान शिरीष बोराळकर यांच्यासाठी हट्टच धरला असून त्यासाठी समीर राजूरकर, दिलीप थोरात यांच्या विरोधात आघाडीच उघडली. तरीही प्रत्यक्षात शिरीष बोराळकर यांच्या नावाला गुप्त मतदानात पसंती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आहे.
शहर भाजपमध्ये आता अतुल सावे विरुद्ध इतर नेते असे गट पडले असून त्या संघर्षाचा भडका उडाला आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल सावे यांनी जंग जंग पछाडूनही बोराळकर यांना विजयी होण्याइतपत मते मिळाली नसल्याचे भाजपचे पदाधिकारी दबक्या आवाजात बोलत आहेत.
भाजप प्रभारी शिवप्रकाश यांना राजी करण्यात अपयश आल्यानंतर आता शहराच्या अध्यक्षपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. त्यांच्या निर्णयावरच शहराध्यक्ष कोण याचा फैसला होणार आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहराध्यक्ष बदलाच्या बाजूने असताना मंत्री अतुल सावे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने भाजपमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.