Nanded Flood News : चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे दाणादाण उडाली आहे. शहरातील अनेक वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते पुढे सरसावले आहेत. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी आज नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोटारसायकलवर बसून शहराच्या विविध भागांना भेटी दिल्या.
अमित देशमुख (Amit Deshmukh) हे राजकारणातील हायफाय नेते म्हणून ओळखले जातात. विरोधक त्यांना हवेतले नेते म्हणूनही हिणवतात. पण तेच अमित देशमुख आज नांदेडमध्ये चक्क मोटारसायकलवर फिरतांना दिसले आणि याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसचा हात सोडला आणि ते भाजपमध्ये गेले.
पक्षाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली, पण लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पराभूत करत दणका दिला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली होती. जिल्ह्यात दौरे आणि सभा घेत अमित देशमुख यांनी वातावरण निर्मिती करत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. काँग्रेस महाविकास आघाडीने ही जागा मोठ्या मताधिक्याने जिकंली यात अमित देशमुख यांचाही मोलाचा वाटा होता.
खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. या धक्क्यातून काँग्रेस सावरत असतानाच नांदेड जिल्ह्यावर अतिवृष्टी आणि पुराचे नवे संकट आले आहे. (Nanded) लोकसभा निवडणुकीत मत मागायला आलेले अमित देशमुख या संकटाच्या काळातही धावून आल्याचे दिसून आले. अमित देशमुख यांनी नांदेड शहरातील विविध भागात जाऊन गोदावरी नदीचे पाणी घरात घुसून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अपतग्रस्तांशी संवाद साधत, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केला.
जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अनेक भागात मोठे वाहन घेऊन जाणे शक्य नसल्याने अमित देशमुख यांनी मोटारसायकलवर जाऊन त्या भागांना भेटी देत नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अमित देशमुख यांच्या या मोटारसायकलवरून करण्यात आलेल्या पाहणीची नांदेडमध्ये चर्चा होत आहे. अमित देशमुखांवर ते हवेतले नेते आहेत, त्यांना मुंबईतच राहायला आवडते, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी आपल्या कृतीतून प्रत्युत्तर दिल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.