

Shaktipith Mahamarg : राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या शिवसेना पक्षाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कळमनुरी तालुक्यातील गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन मोजणीला विरोध करत ती बंद पाडली.
नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. मात्र या महामार्गाला मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकाणी विरोध होत आहे. राज्यात महायुती असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघात हा महामार्ग अडचणीचा ठरू लागला आहे.
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, धाराशीव, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुपीक जमीनी या महामार्गात जात असल्याने तीव्र विरोध आहे. यावरून मराठवाड्यात अनेक आंदोलनही झाली. काही जिल्ह्यांमध्ये मोजणीला तात्पुर्ती स्थगिती देण्यात आली होती. आता ही मोजणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
शक्तिपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातूनही तीव्र विरोध सुरूच आहे. गुरुवारी कळमनुरी तालुक्यातील बऊर आणि कांडली गावांच्या शिवारात पोलीस बंदोबस्तात सुरू असलेली महामार्गाची मोजणी प्रक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मिळून बंद पाडली.
यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी थेट घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना मोजणी तात्काळ थांबवून निघून जाण्यास सांगीतले. ज्यामुळे प्रशासनाची मोठी कोंडी झाली. हिंगोली जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या प्रस्तावित महामार्गात जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.
बऊर आणि कांडली परिसरात महसूल अधिकारी व मोजणी पथक पोलीस बंदोबस्तात मोजणीसाठी दाखल झाले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काम रोखले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत मोजणी पथकाला खडसावले आणि मोजणी प्रक्रिया थांबवून परत फिरण्यास सांगितले.
या भागात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. जर त्यांची एकमेव असलेली शेतजमीन महामार्गासाठी संपादित केली, तर या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने पुढे काय खायचे?" असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची बाजू घेत बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना काही निरोप येतो का? हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.