Marathwada Political News : जिल्ह्यातील राजकारणात प्रभावी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केले आहे. राजकारणात सक्रिय झालेले दुसऱ्या पिढीतील युवा नेते यशस्वी होताना दिसत आहेत.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव विक्रांत शिंदे हे निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ते राजकारणात सक्रिय झाले असून, त्यांच्यावर सभापतिपदाची जबाबदारी साेपविणार असल्याची चर्चा आहे.
येणाऱ्या काही दिवसांत लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक होणार आहे. सभापतिपदासाठी दोन संचालक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आमदार श्यामसुंदर शिंदे (Shaymsunder Shinde)
आपल्या पुत्राला संधी देतात, की त्यांच्या समर्थकाला याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा धुराळा शांत झाला आहे. (Marathwada) या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलच्या उमेदवारांनी युतीच्या पॅनेलचा धुव्वा उडविला आहे.
या निवडणुकीच्या निकालानंतर आता नवनिर्वाचित संचालकांना सभापती, उपसभापती निवडीचे वेध लागले आहेत. (Nanded) येत्या काही दिवसांत सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पाडणार आहे.
या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, उत्सुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातपैकी सहा बाजार समितीत महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचेच सभापती, उपसभापती होणार हे निश्चित आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदेंनी यांनी खासदार प्रतापराव पाटील यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला. या कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती व उपसभापती कोणाला करायचे, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे राहणार आहेत.
ते ज्या नावला पसंती देतील तो सभापती होईल. त्यांचे चिरंजीव विक्रांत शिंदे हे सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत. तसेच आमदारांचे खंदे समर्थक चंद्रसेन पाटील हेही निवडून आले आहेत.
सभापतिपदासाठी हे दोघेही दावेदार मानले जातात. त्यामुळे पुत्र प्रेम, की सच्चा कार्यकर्ता असा पेच आमदार शिंदे यांच्यासमोर निर्माण होऊ शकतो. या निवडणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधकांना एकत्र आणून महाविकास आघाडीचे पॅनेल तयार केले होते.
या बाजार समितीवर गेल्या वीस वर्षांपासून खासदार चिखलीकर यांच्या गटाची सत्ता राहिली आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी श्यामसुंदर शिंदे यांनी निवडणूकीची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली होती.
शिंदे यांच्या पॅनेलचे १६ उमेदवार निवडून आले, तर खासदार चिखलीकर गटाचे फक्त दोन. शिंदेच्या पॅनेलमधून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक चंद्रसेन पाटील हे चिखलीकर गटाचे होते. त्यांनी खासदारांची साथ सोडली व आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले.
चंद्रसेन पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून, त्यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती, लोकसभा विधानसभा या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सभापती कार्यकर्ता करायचा, की पुत्राला संधी द्यायची हे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना ठरवावे लागणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.