AIMIM News : या देशात सर्वाधिक जमिनी वक्फ बोर्डाच्या आहेत, यातील 80 टक्के जमिनी, मालमत्ता या राजकीय नेत्यांनी हडपल्या आहेत. तर उर्वरित जमिनी मोदी सरकार नवी विधेयक आणून त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालण्याचा घाट घालत आहेत, अशा शब्दात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर टीका केली.
वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम व्यक्तींचा समावेश करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, मग साईबाबा संस्थान, पंढरपूर किंवा तिरुपती बालाजी ट्रस्टवर हे सरकार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना घेणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी हे विधेयक असल्याचे मोदी आणि त्यांचे सरकार सांगत असले तरी त्यांचा मूळ उद्देश हा बोर्डाच्या जमिनी लाटणे हाच असल्याचा, आरोप इम्तियाज जलील यांनी केला. बोर्डाला निर्णय घेण्याचा अधिकारच ठेवण्यात आला नसल्यामुळे यातून मुस्लिम समाजाला कसा न्याय मिळणार? हा खरा प्रश्न आहे.
देशामध्ये मुस्लिम समाजावर सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. (AIMIM) या विरोधात आता दाद कोणाकडे मागावी हाच खरा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही आता अपेक्षा राहिलेली नाही. कारण तिथे प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे, पण सुप्रीम कोर्टातून निवृत्त होणारे न्यायाधीश मोदींकडे जाऊन बसतात, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली. मुस्लिम समाजामध्ये हुशार आणि विचारवंत लोकांची कमी नाही, त्यामुळे बोर्डावर तज्ञ लोकांना घेण्यासाठी हे सुधारणा विधेयक असल्याचा भाजपचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आली तेव्हापासून आम्हाला भिती घालण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
कधी ट्रिपल तलाक, कधी बीफ संदर्भातली बिल आणून आम्हाला लक्ष्य केले. आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हा या सरकारचा आणखी एक खोडसाळपणा आहे. बापजाद्यांपासून असलेल्या मुस्लिमांच्या संपत्तीवर डोळा ठेवून हे विधेयक आणले गेले आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांनी यासंदर्भात दिशाभूल केली असून बोर्डावर आम्हाला मुस्लिम धर्मातील इतर छोट्या मोठ्या जाती, महिला यांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याचे म्हटले आहे.
परंतु आधीही बोर्डावर अशा प्रकारच्या नियुकत्या झालेल्या आहेत. त्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. असे असताना विधेयकात सुधारणेच्या नावाखाली पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांना माझा एक प्रश्न आहे, त्यांनी पाच दिवसाचे विशेष अधिवेशन बोलून महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्या निर्णयाचे काय झाले?
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या निर्णयाची अंमलबजावणी करून महिलांना मोदींनी न्याय का दिला नाही? मग तुम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न का करत आहात? की, बोर्डावर महिला प्रतिनिधींना संधी देऊन आम्ही त्यांना न्याय देत आहोत. दुसऱ्या समाजाच्या लोकांना वक्फ बोर्डावर का टाकायचे आहे? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. वक्फ बोर्डाच्या 80% मालमत्ता राजकीय लोकांनी खरेदी केल्या आहेत किंवा हडपल्या आहेत. आता त्यांना संरक्षण देण्यासाठीच हे नवे विधेयक मोदी सरकारने आणले आहे, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.