
BJP News : महापालिकेत नगरसेवक, दोनवेळा महापौर, विधानसभा लढवण्याची संधीही मला पक्षाने दिली. पण आमदार होणे माझ्या नशिबात नव्हते. पराभवानंतर विधान परिषदेवर संधी मिळेल असे वाटले होते, मात्र तिथेही निराशाच झाली. त्यापेक्षा काहीतरी मोठे मला मिळणार होते म्हणून कदाचित थोडा वेळ लागला. ध्यानीमनी नसताना मला पक्षाने राज्यसभेवर संधी दिली. हे कमी की काय? पुन्हा केंद्रात राज्यमंत्री ते ही अर्थ खात्याचे करत माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली. मी देखील या विश्वासाला पूर्ण न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर खरतरं मला कॅबिनेटपदी बढती मिळेल, अशी अपेक्षा होती. पण घडले वेगळेच. माझे आहे ते मंत्रीपदही गेले. पण मला याचे दुःख किंवा खंत नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले. त्यामुळे केंद्राच्या मंत्रींमडळातील महाराष्ट्राचा कोटा घटवल्यामुळे मला संधी देण्यात आली नसल्याचा मला फोन आला. मंत्रीमंडळाच्या शपथविधीला मी व्यासपीठावर असायला हवा होतो, पण मी खाली होतो, अशी खंतही कराड यांनी व्यक्त केली.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मी पुढे आलो. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. वैद्यकीय शिक्षण घेऊन डाॅक्टर झालो. 1990 च्या काळात मी माझ्या वैद्यकीय व्यवसायात रमलो, स्थिरावलो आणि अचानक महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आलो. (BJP) अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कालांतराने भाजपात प्रवेश केला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला संधी दिली, विधानसभेची उमेदवारी दिली पण माझा पराभव झाला. महापालिकेत नगरसेवक, महापौर होऊन लोकांची कामे करता आली.
राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर अर्थ खात्याचा राज्यमंत्री झालो. देशभरातील बँका आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यांच्या मदतीने अनेक समाजोपयोगी कामे करता आली. केंद्रात राज्य मंत्री असल्याने पंतप्रधानांसह सगळ्याशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्याचा फायदा संभाजीनगर, मराठवाडा आणि महाराष्ट्रात विविध प्रकल्प योजना आणण्यासाठी करता आला याचे समाधान आहे.
पाईपद्वारे गॅस पुरवण्याची योजना, हवामानाचा अचूक अंदाज घेणारी डाॅपलर यंत्रणा, जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर साऊंड आणि लाईट शो, अशा अनेक गोष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्या पदरात पाडून घेतल्या. वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी असा एक अखंड पूल आणि त्यावर मेट्रो असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीही मी पाठपुरावा करत आहे. या शिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये देश आणि विदेशातील उद्योग, गुंतवणूक यावी यासाठी मंत्रीपदाच्या कार्यकाळात भरपूर प्रयत्न केले, त्यामुळे अनेक मोठे उद्योग इथे आल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.