Parbhani News: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी गेली 32 वर्ष शिवसेनेचा खासदार आहे तर जिल्ह्यात दोन ते तीन आमदार निवडून येतात. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे सुरुवातीपासून वर्चस्व राहिले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. या वेळी विधानसभानिहाय आढावा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी घेतला. यावेळी येथील शिवसैनिकांनी त्यांच्या समोरच खदखद व्यक्त केली. परभणी जिल्ह्याला मंत्रीपद कधी देणार व न्याय कधी मिळणार? असा सवाल शिवसैनिकांनी खासदार निंबाळकर यांना विचारला. (Omraje Nimbalkar News)
शिवसेनेच्या पाठीशी परभणी जिल्हा गेल्या अनेक दिवसापासून उभा राहत असतानाही शिवसेनेला न्याय कधी देणार? मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदे देण्यात आली, पण परभणी जिल्ह्याला मंत्रीपद देण्यापासून का वंचित ठेवण्यात आले? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, घनसांगवी आणि परतुर या सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी परभणी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या सहा विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेची स्थिती जाणून घेतली.
बैठकीवेळी आढावा सुरु असताना उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी एक पदाधिकारी उभा राहिला. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे म्हणतात पण परभणी जिल्ह्याला मंत्रीपद का मिळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी परभणीला मंत्रिपद मिळणार आहे का? असा थेट सवालच या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या बाबतीत आपला सूर मिसळला.
शिवसैनिकांनी व्यक्त केली नाराजी
गेल्या दोन निवडणुकांनंतर राज्यात सत्ता आली. २०१४ साली राज्यात सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल, अशीच अपेक्षा होती. पण दोन्ही वेळेस परभणीच्या आमदारांना मंत्रिपदाची माळ घातलीच नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.