Marathwada Politics News : नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि साहेबांचे घड्याळ हाती बांधून घेतले. (Nationalist Congress Party News) यात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी शिक्षणमंत्री कमल किशोर कदम, दिवंगत आमदार साहेबराव बापू देशमुख बारडकर, दिवंगत नेते आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब गोरठेकर, दिवंगत नेते माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटुरकर, डॉ. सुनील कदम, धर्मराज देशमुख, माजी आमदार प्रदीप नाईक, माजी राज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर आदींचा यामध्ये समावेश होता.
पैकी सूर्यकांता पाटील, माधव पाटील किन्हाळकर, धर्मराज देशमुख हे भाजपत गेले आहेत, तर शेतकरी संघटनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले कंधार-लोह्याचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी बीआरएसचा मार्ग धरला आहे. (Nanded) राष्ट्रीवादीने विधान परिषदेत पाठविलेले आमदार वसंतराव चव्हाण हे काॅंग्रेसमध्ये गेले आहेत. (Congress) पक्षाची जिल्ह्यातील परिस्थिती नाजूक असतानाच राष्ट्रवादीचे राज्यात दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी खासदार शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
तर काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला जवळ केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची (NCP) बाजू अत्यंत नाजूक बनली आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समिती व अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत. जिल्ह्यातील राजकारणात कोणता गट प्रभावी आहे हे येणाऱ्या काळातील निवडणुकीतील कामगिरीनंतर सिद्ध होईल. या दोन्ही गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक पातळीवर खूप मोठे काम करून आपले अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील राजकारणात काॅंग्रेसचे वर्चस्व राहिल्याने बहुसंख्य आमदार, खासदार मंत्री याच पक्षाचे राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील काही बडे नेते राष्ट्रवादीमध्ये गेले. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले, त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही. तसेच शरद पवारांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकांता पाटील नांदेड जिल्ह्यातल्या असूनही आघाडीच्या जागावाटपामुळे हिंगोलीतून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. यूपीए सरकारमध्ये शरद पवारांनीच त्यांना केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री केले होते.
किनवट विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा प्रदीप नाईक निवडून आले होते, पण गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दिवंगत नेते बापूसाहेब गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातून शंकर आण्णा धोंडगे हेही एकदा निवडून आले. काॅंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा फायदा जिल्ह्यात दोन्ही पक्षाला झाला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन संचालक निवडून आले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही पक्षाचे काही संचालक निवडून आल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळाले.
किनवट, धर्माबाद, उमरी नायगाव, कंधार, लोहा आदी भागात पक्षाचे संघटन आहे. उमरी परिसरात दिवंगत नेते आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब गोरठेकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. उमरी नगरपालिका व पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. बापूसाहेब गोरठेकरांनी जिल्हाध्यक्षपद सक्षमपणे सांभाळले होते. ते नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले होते. किनवट मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शेतकरी चळवळीतून राजकारण आलेल्या शंकर आण्णा धोंडगे यांना कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि ते विजयीही झाले होते.
पक्षाचा हा पूर्व इतिहास पाहता राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, विविध आघाड्याचे पदाधिकारी हे पक्षफुटीनंतरही शरद पवार यांच्यासोबत आहेत. काही मोजकेच पदाधिकारी अजित पवार यांच्या गटाकडे गेले आहेत. या गटाचे जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत, पण परिपूर्ण अशी जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी कोणता झेंडा हातात घ्यावा, अशा द्विधा मनस्थितीत आहेत. राष्ट्रवादीला नाजूक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज असून, राज्य पातळीवरील नेत्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.