

Nanded Politics : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांनी मित्र पक्षांना फारसे महत्त्व दिले नाही. राज्यात महायुती असली तरी जिल्ह्यात भाजपाची शतप्रतिशत सत्ता आणि सूत्रं आपल्या हाती ठेवू पाहणाऱ्या चव्हाण यांना आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत आव्हान देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वाढते जिल्हा दौरे पाहता शिवसेना झेडपीचे मैदान मारणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचे आदेश दिलेले असताना अशोक चव्हाण यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दूर ठेवत स्वबळावर निवडणूक लढली आणि जिंकली.
विशेष म्हणजे, युतीला नकार देत शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांमध्येच चव्हाण यांनी फूट पाडली आणि बालाजी कल्याणकर यांना आपल्या बाजूने करून घेतले. प्रत्यक्षात महापालिकेची सत्ता बहुमतासह ताब्यात आल्यानंतर मात्र महापौर, उपमहापौर आणि महत्त्वाची सगळी पद त्यांनी भाजपाकडेच घेतली.
अशोक चव्हाण यांच्या राजकीय डावपेचांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही बसला. शिवसेना-राष्ट्रवादी हे मित्र पक्ष तर दुखावले गेलेच, पण भाजपाच्या जिल्ह्यातील आमदार, नेत्यांना देखील अशोक चव्हाणांचे काही निर्णय खटकले, पण त्यांनी गप्प राहणे पसंत केल्याचे बोलले जाते.
भाजप म्हणजेच अशोक चव्हाण यांच्याकडून मित्रपक्षांना मिळणारी ही वागणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमधील अनुभव पाहता शिवसेनेने सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे. शिवसेनेने नांदेडमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली असून अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातच ताकद वाढवण्याचा निर्धार केला आहे.
जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, असा स्पष्ट संदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना या दौऱ्यात दिला. नांदेड येथील शिवसेनेच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सामंत यांनी आगामी निवडणुकींसाठी आतापासूनच संघटनात्मक तयारीला लागण्याचे आवाहन केले.
SIR नोंदणीवर विशेष भर देत प्रत्येक मतदारसंघात जास्तीत जास्त नोंदणी करण्याच्या सूचना देतानाच निवडणूक जिंकायची असेल तर बूथ पातळीवर संघटन मजबूत करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र ओळख निर्माण करून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत शिवसेनेने याच जिल्ह्यात संघटन विस्ताराचा कार्यक्रम राबवून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.