जलील पठाण
Marathwada Political News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात छाप पाडू पाहणारे औसा मतदारसंघाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना सध्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच स्थानिक पातळीवर विरोध होऊ लागला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी व्हिजन घेऊन वाटचाल करत असलेल्या अभिमन्यू पवार यांच्या या प्रयत्नांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अफसर शेख करत असल्याचा आरोप केला जातोय.
आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी किल्लारी व कासार सिरसी येथे अपर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले. याशिवाय बेलकुंड येथे अतिरिक्त एमआयडीसी, औसा शहरात भव्य असे बसस्थानक उभे राहिले. परंतू या सगळ्या कामात खोडा घालण्याचे काम जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्याकडून केले जात असल्याचे बोलले जाते. याआधीच संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध अभिमन्यू पवार यांच्यात कासार सिरसी अपर तहसील कार्यालयात निलंगा मतदारसंघातील गावांचा समावेश केल्यावरून संघर्ष उडाला आहे. त्यात आता डॉ. शेख यांची भर पडली आहे.
आता किल्लारी अप्पर तहसीलला जोडण्यात आलेल्या गावाबद्दल डॉ. शेख यांनी आक्षेप घेत विरोध केला असून थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) धाव घेतली आहे. ही गावे किल्लारी तहसीलशी जोडण्यात आल्यामुळे आपली गैरसोय होणार असल्याचे अनेकांनी प्रशासनाला कळविले आहे. जी गावे किल्लारीच्या जवळ आहेत त्यांनाच किल्लारीला जोडण्यात यावे, अशी भूमिका अफसर शेख यांची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औसा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण झाला आहे.
औसा तहसीलला जोडलेली 46 गावे नऊ ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाने किल्लारी अपर तहसीलशी जोडण्याचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला. त्यामुळे औसा तहसीलला आता फक्त 87 गावे शिल्लक राहिली आहेत. वास्तविक पाहता विभक्त केलेली ही गावे मातोळा, लामजना व किल्लारी मंडळांमधील आहेत व यामधील बहुतांश गावे औसा शहरालगत आहेत. या गावांचा औसा शहराशी दैनंदिन व्यवहार, व्यापार, वैद्यकीय, शाळा, महाविद्यालय बँकिंगसाठी संबंध येतो, असा दावा केला जात आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी परिसर भूकंपग्रस्त असून भूकंपग्रस्त प्रमाणपत्र तयार करणे व तत्सम किरकोळ कारणे देऊन किल्लारी अपर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. आणि त्यामध्ये असेही नमूद करण्यात आले, की लोकसंख्या वाढीमुळे औसा तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय ताण पडत आहे. मात्र, हे चुकीचे असल्याची टीका डॉ. शेख यांनी केली आहे. तसेच अप्पर तहसील लोकांच्या गैरसोयीचे असल्याचा आरोप करीत या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कासारसिरसी तालुका करण्याचा शब्द अभिमन्यू पवार यांनी लोकांना दिला होता. यालाही निलंग्यातून मोठा विरोध झाला. कासार सिरसी तालुका होण्याला किल्लारीकारांनीही कडाडून विरोध केला. किल्लारीच्या लोकांचा वाढता विरोध पाहून आमदार पवारांनी कासार सिरसी व किल्लारी या दोन्ही ठिकाणी अप्पर तहसील मंजूर करून घेतले. किल्लारी अप्पर तहसीलला औसा तहसीलची अनेक गावे जोडण्यात अली. याच गोष्टींचे भांडवल राष्ट्रवादीचे अफसर शेख यांनी केल्याचा आरोप होत आहे.
आमदार पवारांच्या विरोधात राष्ट्रवादीने भूमिका घेतल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेख यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या शेख यांनी आता थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. एकीकडे पक्षांतर्गत विरोध तर दुसरीकडे युतीतील घटक पक्षाचा खोडा यामुळे अभिमन्यू पवारांची कोंडी होत आहे. राष्ट्रवादीच्या शेख यांचा बोलवता धनी कोण आहे? याबद्दलही चर्चा होताना दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.