भोकरदन : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) भोकरदन तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ (Ramesh Sapkal) यांनी माजी आमदार चंद्रकांत दानवे (Chandrakant Danve) यांच्या सूचनेनुसार भायडी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा गजानन जंजाळ (ZP Member Manisha Janjal) यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केल्याची एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. याला चार दिवस उलटत नाही तोच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी या हकालपट्टीला स्थगिती दिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ही स्थगिती म्हणजे दानवे यांना एकप्रकारे राजकीय दणका असल्याचे बोलल्या जात आहे.
भोकरदन तालुक्यातील भायडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या जंजाळ यांनी 2017 ला झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेची निवडणूक व त्यांनतर सतत पक्षाविरोधात त्यांनी काम केल्याचा ठपका ठेवत (ता.24 जानेवारी) माजी आमदार चंद्रकांत दानवेंच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या झालेल्या सर्कल निहाय बैठकीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राष्ट्रवादीचे भोकरदन तालुकाध्यक्ष सपकाळ यांनी हे प्रसिद्धी पत्रक काढून जाहीरही केले होते. मात्र, ही हकालपट्टी जंजाळ यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, (Jayant Patil) आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे व इतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटी-गाठी घेत पक्षात काम करूनही अन्याय होत असल्याचे पटवून दिले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी जिल्हाध्यक्ष निसार देशमुखांना जंजाळ यांच्या हकालपट्टीला स्थगिती देण्याची सूचना केली.
सुचनेनूसार जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी (ता.27 जानेवारी) पत्र काढून जंजाळांच्या हकालपट्टीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. या प्रकरणामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीची धुसफूस मात्र चव्हाट्यावर आली आहे.
दरम्यान, या पत्रात जिल्हा परिषद सदस्या जंजाळ यांच्यासह त्यांचे दीर केशव जंजाळ यांचाही पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे सपकाळांनी हकालपट्टीच्या पत्रात नमूद केले होते. जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी स्थगिती दिलेल्या पत्रात मनीषा जंजाळ यांच्यासह केशव जंजाळ यांच्याही हकालपट्टीला स्थगिती दिल्याचे नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.